नाशिक : नैराश्य भावनांचा आजार असून, त्यावर सायकियॅट्रिकच्या सल्ल्याने औषधोपचार शक्य आहे. या आजाराच्या रुग्णांचे आयुष्य योग्य औषधोपचारांच्या मदतीने पुन्हा पूर्वपदावर येते याची मूर्तिमंत उदाहरणे समाजासमोर आहेत. अशा नैराश्यात अडकलेल्या गरजूंनी किंवा त्यांच्या नातेवाइकांनी कुठल्याही प्रकारचा संकोच मनात न ठेवता उपचारासाठी तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन नैराश्यातून बाहेर पडलेल्या व्यक्तींनी ‘लव्ह यू जिंदगी’ या परिसंवादाच्या माध्यमातून केले आहे.इंडियन सायकीयॅट्रिक सोसायटी नाशिक शाखा, इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक व पंख फाउंडेशन, औरंगाबादतर्फे शालिमार येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. एच. एस. जोशी सभागृहात शुक्रवारी (दि.२६) इंडियन सायकियॅट्रिक सोसायटीच्या पश्चिम भारत शाखेतर्फे २९व्या निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण परिषदेत नैराश्यातून बाहेर पडलेल्या व्यक्तींसोबत ‘लव्ह यू जिंदगी’ या कार्यक्रमातून संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडियन सायकियॅट्रिक सोसायटीच्या पश्चिम भारत शाखेचे अध्यक्ष डॉ. राजेश धुमे, पंख फाउंडेशनचे डॉ. विक्रांत पाटणकर, डॉ. मोनाली देशपांडे, परिषेदेचे पदाधिकारी डॉ. बी. एस. व्ही. प्रसाद , डॉ जयंत ढाके, डॉ. महेश भिरुड आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. नीलेश जेजूरकर यांनी नैराश्याच्या गर्तेतून बाहेर निघालेल्यांना त्यांच्या अनुभवांविषयी प्रश्न विचारून बोलते केले.
नैराश्यावर योग्य औषधोपचारांनी मात करणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:32 AM