नाशिक : मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेच्या निविदाप्रक्रियेसंबंधी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह काही नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये योजनेच्या निविदाप्रक्रियेला ताप्तुरती स्थगिती दिली आहे. सायंकाळी आयुक्तांना सदर स्थगिती आदेशाचा फॅक्स प्राप्त झाला. विशेष म्हणजे मंगळवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत योजनेच्या अतिरिक्त ३६ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी ठेवला असून, या स्थगितीमुळे आयुक्तांकडून प्रस्ताव मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निविदाप्रक्रियेची चौकशी पूर्ण होईपर्यंत योजना पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी किमान दराची निविदा प्राप्त झालेल्या चेन्नईतील लार्सन अॅण्ड टुब्रोने २६६ कोटी रुपये इतका अंतिम देकार दर्शविल्याने मूळ मान्यतेच्या २३० कोटींपेक्षा दहा टक्के जादा म्हणजे ३६ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर पडणार आहे. या अतिरिक्त रकमेस तसेच योजनेतील काही तांत्रिक बदलांसंबंधीचा प्रस्ताव आयुक्तांनी मंगळवारी होणाऱ्या महासभेत मान्यतेसाठी ठेवला आहे; परंतु तत्पूर्वीच महासभेच्या पूर्वसंध्येला योजनेच्या निविदाप्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देणारा आदेश आयुक्तांना पाठविण्यात आला.
निविदाप्रक्रियेला ताप्तुरती स्थगिती
By admin | Published: May 19, 2015 1:56 AM