सिडको : महापालिकेच्या सिडको पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे सिडकोतील उत्तमनगर भागात सोमवारी संध्याकाळपासून तर बुधवारी सकाळपर्यंत तब्बल १८ तास पाणीपुरवठा सुरू होता. यामुळे रस्त्यावरच सर्वत्र पाणीच पाणी साचले होते.सिडको परिसरात काही भागांत कमी दाबाने, तर काही भागांत पाणीच येत नसल्याचे अनेकदा झाले आहे, यंदाच्या वर्षी पाऊस कमीझाल्याने आतापासूनच पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनालाच या विषयाचे गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे तब्बल १८ तास पाणीपुरवठा होऊन नळ धो-धो वाहून रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी होते. इतर वेळेस कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा मात्र दोन दिवस व्यविस्थत झाला.तांत्रिक अडचणीमुळे हा पाणीपुरवठा सुरू होता अशी माहिती मिळाली. मात्र त्यावर उपाययोजना केल्या नसल्याचेही समोर आले. अशी परिस्थिती घडल्यावर मनपाच्या इतर यंत्रणा वापरून त्यावर नियंत्रण मिळवायला हवे. मात्र लोकप्रतिनिधींसह मनपा अधिकाऱ्यांनी यावर कानाडोळा केल्याचे समोर आले.
गलथान कारभारामुळे उत्तमनगरला १८ तास पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:42 AM