बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील बळीराजाचे कांदा हे व्यापारी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाच्या उत्पादनावर व भावावर येथील शेतक-यांच्या प्रपंचाचे आर्थिक गणित अवलंबून असते. तीन वर्षाचा लेखाजोखा पाहता कांद्याला समाधानकारक भाव मिळालेला नसून भाव वाढू लागताच त्यावर टाच आणून बाजार स्थिर करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप शेतक-यांना मारक ठरू लागला आहे. सलग तीन वर्षापासून समाधानकारक भाव मिळालेला नसल्याने यावर्षी बसणारा फटका दुरगामी परिणामकारक ठरण्याची धास्ती आहे. कांद्याला दोन पैसे जास्त मिळविण्यासाठी व टप्याटप्याने कांदा बाजारात आणण्यासाठी बळीराजाने मे अखेर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. हा साठविलेला कांदा आता खराब होऊ लागला आहे. कमी पर्जन्यमानामुळे खरीपाच्या कांदा उत्पादनात घट, भाव वाढण्याची शक्यता तर कधी चिनचा कांदा दाखल असे संदेश सध्या समाज माध्यमांमधून फिरत असल्याने बळीराजाच्या मनात भीतीचे काहूर दाटले आहे. चांगला बाजार भाव मिळण्याच्या अपेक्षेने दोन महीने चाळीत साठविलेल्या कांद्याला दराच्या घसरत्या आलेखाचा फटका बसल्याने सध्याचा बाजारभाव पाहता उत्पादन खर्चही हाती पडणार नाही अशी स्थिती आहे. भारताच्या बाजारपेठेवर चीनच्या कांद्याने कब्जा केल्याने निर्यातीला ब्रेक लागला असून त्यामुळेच स्थानिक कांद्याचे दर घसरल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 5:55 PM