कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री सप्तशृंगमातेच्या सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाच्या रविवारी चौथ्या दिवसअखेर लाखो भाविक देवीसमोर नतमस्तक झाले. उदे गं अंबे उदे, जय मातादी, सप्तशृंगमाता की जय... या जयघोषात सप्तशृंगगडावर रविवारी चौथ्या माळेला हजारो भाविकांनी भगवतीचे मनोभावे दर्शन घेतले. शनिवार व रविवार सुटीच्या दिवसांचे औचित्य साधून भाविकांची मांदियाळी गडावर दिसून आली. दोन दिवसांच्या सुट्टीमुळे देवीभक्तांनी गडावर चांगलीच गर्दी केली होती. चौथ्या दिवसाची महापूजा देवीभक्त न्यायाधीश मृदुला भाटकर, सिनेकलाकार रमेश भाटकर, विश्वस्त अविनाश भिडे, विश्वस्त रावसाहेब शिंदे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, महंत संविदानंद सरस्वती, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्यासह मान्यवरांनी भगवतीची पंचामृत महापूजा करून आरती केली. सकाळी ७.३० वाजता श्री सप्तशृंगदेवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ८ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. शनिवार, रविवार सलग दोन दिवसांची सुट्टी असल्यामुळे गडावर देवीभक्तांनी चांगलीच गर्दी केली होती. दूरवरून पायी येणारे भाविक गडावर पोहोचल्यामुळे भाविकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली, दुपारी १२ वाजता देवीची पंचामृत महापूजा करण्यात येऊन हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते.प्रशासनाने घेतलेल्या प्लास्टिकमुक्तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, तसेच ग्रामस्थ पुढाकार घेताना दिसून येत आहेत. त्यात शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश गवळी, सरपंच राजेश गवळी, माजी सरपंच संदीप बेनके व ग्रामपंचायतचे कर्मचारी व नागरिक तसेच स्वयंसेवक स्वयंस्फुर्तीने भाविकांना मदत करीत आहेत. कळवणचे पोलिस उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुजय घाटगे यांनी गडावर सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे .
सुट्यांमुळे सप्तंशृगगडावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 1:09 AM