सातपूर :- प्लेटिंग उद्योगांना क्लोजरच्या नोटिसा दिल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यास सुरुवात केल्याने संतप्त उद्योजकानी खासदार आणि पालकमंत्र्यांकडे धाव घेतली.अखेर मंत्रालयातून ही कारवाई थांबविण्याबरोबरच क्लोजर नोटिसा स्थगित करण्याचा आदेश आल्यानंतर उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ( सीईटीपी) नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील 50 ते 60 उद्योगांना क्लोजरच्या नोटिसा बजावल्या होत्या.या नोटिसांमुळे उद्योजक भयभीत झाले होते.तर मागील मंगळवारी नाशिक सीईटीपी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव,मनपा आयुक्त यांची तातडीची आॅनलाईन मिटिंग घेऊन सीईटीपी साठीचा निधी मिळत नाही तोपर्यंत कारवाई करु नये अशी मागणी करण्यात आली होती.दरम्यान गुरुवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सातपूर मधील सुमारे 17 प्लेटिंग उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरु केली. या कारवाईच्या विरोधात नाशिक सीईटीपी फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक गोखले,उपाध्यक्ष समीर पटवा,सचिन तरटे,अशोक थेटे,मिलिंद देशपांडे,इंद्रपाल सहानी,उमेश जोशी,कमलेश उशीर,मनीष रावल,राजेश गडाख आदींसह प्लेटिंग उद्योजकांनी एकत्र येत विरोध केला आणि नाशिक सीईटीपी फाउंडेशनच्या पदाधिकाºयांनी खासदार हेमंत गोडसे यांना कळविले.तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनाही बोलावून घेतले.ठाकरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधून कारवाई थांबविण्याची मागणी केली.खासदार हेमंत गोडसे यांनी प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालयात धाव घेतली.व उद्योगमंत्री सुभाष देसाई,एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनबनगल यांचेशी सम्पर्क साधून कारवाई थांबविण्याची आग्रही मागणी केली.दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पर्यावरण मंत्री बनसोड,एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनबनगल,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव अशोक शिंगारे यांच्याशी संपर्क साधून कारवाई थांबविण्याचे निर्देश दिलेत.त्यानुसार प्लेटिंग उद्योगांचा पाणी आणि विद्युत पुरवठा बंद करण्याची कारवाई थांबविण्यात आली आहे.