नाशिक : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शासकीय आणि खासगी सेवेतील १८ हजारांहून अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच सुमारे पावणेदोन लाख बाधित कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतण्याची किमया घडली आहे. वर्षभरातील कोरोना थैमानाच्या काळातही या आरोग्य योद्ध्यांनी दिलेले योगदानच जिल्ह्यातील मृत्युसंख्या काहीशी कमी करण्यात कारणीभूत ठरली आहे.
जिल्ह्यात कार्यरत असलेले जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, खासगी दवाखाने, रुग्णालये, मल्टी नॅशनल कंपन्यांची हॉस्पिटल्समधील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गत वर्षभरापासून अव्याहतपणे दिलेली सेवाच जिल्ह्यात काही प्रमाणात तरी कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर जिथे कुटुंबातील माणसांकडूनदेखील कुटुंबातील दुसऱ्या बाधिताशी संपर्क साधला जात नव्हता, अशा काळातही याच आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपापले कर्तव्य बजावले. बहुतांश रुग्णालयांमधले प्रमुख डॉक्टर्स, सहायक डॉक्टर्स, शिकाऊ डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, नर्स, वॉर्डबॉय, सहायक आरोग्य कर्मचारी अशा सर्वांना कोरोनाची बाधा झाली. मात्र, त्या बाधेलादेखील न घाबरता औषधोपचार घेऊन बरे झाल्यानंतर तेच डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी पुन्हा बाधित नागरिकांच्या सेवेत दाखल झाले. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांचे घर लहान असल्याने आपल्यामुळे कुटुंबातील इतरांना बाधा नको म्हणून दोन-दोन महिने घरापासून लांब राहून कार्यरत रहावे लागले. तर काहींच्या कुटुंबात या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळेच कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकारदेखील घडले. तरीदेखील न डगमगता या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्याला आणि कोरोनाला पळवून लावण्याच्या लढाईत कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले. त्यामुळेच जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख नागरिक बरे होऊन आपापल्या घरी आणि कोरोनाविरोधी लढाईत पुन्हा सक्रिय होऊ शकले. या संपूर्ण काळात काही आरोग्य सेवकांना अनेक ठिकाणी कटू प्रसंगांचादेखील सामना करावा लागला. मात्र, तरीदेखील त्या प्रसंगातील कटुता मनात न ठेवता किंवा त्या घटनांचा रुग्णसेवेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. त्यामुळेच इतके मोठे यश जिल्ह्यातील आरोग्य विभागाला लाभू शकले आहे.
कोट
जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वर्षभर अथक मेहनत घेतली. जीवावर उदार होऊन कोरोनासारख्या अज्ञात संकटाशी वर्षभर दोन हात केले असून, ही लढाई कोरोना नामशेष होईपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. सध्याची परिस्थिती बिकट असली तरी त्यावरही सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातूनच मात केली जाईल, असा विश्वास वाटतो.
डॉ. निखिल सैंदाणे, घटना व्यवस्थापक, जिल्हा रुग्णालय
-------------------
स्लग - जागतिक आरोग्य दिन विशेष