येत्या शुक्रवारी (दि. १६) मतदान होत असून निवडणूक कामात मजूरवर्ग व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामामध्ये शेतमजुरांची वानवा जाणवत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून आज प्रचार ताेफा थंडावत असल्या, तरी इतर कार्यकर्त्यांना रात्रीची कामे करावी लागत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारकामासाठी भाडोत्री कार्यकर्ते म्हणून मजूर गेले असल्याने शेतीची कामे रेंगाळली आहेत. काही शेतकरी रात्रीच्यावेळी ट्रॅक्टर लावून त्याच्या प्रकाशात कांदा लागवड करताना दिसत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामस्थांना प्रचाराची रंगत पाहावयास मिळत आहे. रुसवेफुगवे, पूर्वीची उणीदुणी यांची जाहीर चर्चा पारावर, चहाच्या टपरीवर ऐकावयास मिळत आहे. त्यासाठी सर्वस्व पणाला लावले जात आहे. याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीकामावर दिसू लागला आहे. कांदे लागवड, गहू, हरभरा व रब्बी पिकांची निंदणी करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरीराजा मेटाकुटीला आला आहे. घरातील कार्यकर्ते निवडणुकीत अडकल्याने घरातील ज्येष्ठ सदस्यांवर जनावरांच्या चारा- पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. कधी एकदा निवडणूक संपते आणि शेतीच्या कामांसाठी मजूर उपलब्ध होतात, याचा विचार शेतकरी करीत आहेत.