नाशिक : गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सुरूच असून, शनिवार पाठोपाठ रविवारीही दिवसभर पाऊस असल्याने अनेक मोठ्या गणेश मंडळांचे देखावेच पूर्ण होऊ शकले नाहीत, तर भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होऊ शकली नाही. आधीच शासनाच्या नियमांच्या जंजाळामुळे गणेश मंडळांचा उत्साह मावळला असून, सार्वजनिक उत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या घटली आहे. मंडपाच्या आकारावर मर्यादा आल्याने बहुतांशी मंडळांनी आरास करण्याऐवजी केवळ गणेशमूर्तीच ठेवल्या आहेत. तरीही गणेश मंडळांनी आरास अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न केला. परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशीपासून पाऊस सुरू झाल्याने मंडळांचे सादरीकरण करणे अडचणीत आले आहेत. मोठ्या मंडळांचे देखावे तसे विलंबानेच होत असले तरी यंदा पावसामुळे अन्य मंडळांनादेखील आरास पूर्ण करता आलेली नाही. गुरुवारपासूनच खरे तर जोरदार पावसाला सुरुवात झाली होती आता सलग पाऊस सुरू राहिला आणि शनिवार- रविवार या सुटीच्या दिवशी अशीच स्थिती राहिल्याने नाशिककरांना देखावे पाहण्याकरिता घराबाहेर पडता आले नाही. रविवारी सकाळपासूनच संततधार कायम असल्याने सुटीचा दिवस असूनही गणेशभक्त देखावे पहायला फिरकले नाहीत. सोमवारी पावसाने विश्रांती दिली तरच मोठी मंडळे सजावट पूर्ण करू शकतील अन्यथा त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:31 AM