वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील बळीराजा सुखवाला आहे. सुकड नाल्यावर बांधण्यात आलेला बंधारा फुटल्याने वटार येथील तलवाडा रस्ता पाण्यात वाहून गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे. लगतच्या चार एकर क्षेत्रात पाणी घुसल्याने पिके पाण्यात वाहून गेली. शेतजमिनीला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.बऱ्याच दिवसांपासून दडी मारून बसलेला वरुणराजा परिसरात जोरदार बरसला. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी शिरून शेतमालाचे नुकसान झाले. रस्ता पाण्यात वाहून गेल्याने एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कपालेश्वर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. परिसरातील नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माजी सरपंच रामदास दादाजी खैरनार यांचा दीड एकर, तर बारकू गोकुळ खैरनार यांचा एक एकर मका पाण्यात वाहून गेला. भिका दामू खैरनार व कलाबाई खैरनार यांच्या तीन एकर डाळींबबागेत पाणी घुसल्याने काही झाडे वाहून गेली, तर काही पावसाच्या जोराने कोलमडली. परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. परिसरातील बळीराजा सुखावला आहे. (वार्ताहार)
वटार येथे अतिवृष्टीमुळे रस्ता गेला वाहून
By admin | Published: July 11, 2016 11:50 PM