मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढल्याने चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा असतानाच सोमवारी (दि. १५) मक्याचे भाव घसरल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. मक्याला १४०० ते १५०० रुपये भाव मिळाला असून, १८५० इतका हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.गेल्या काही दिवसांपासून मक्याच्या दरात सातत्याने घसरण पहायला मिळाली. गेल्या शुक्रवारी (दि. १२) मक्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे मिळाल्याचे समाधान होते. मात्र सोमवारी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सत्रात लिलाव सुरू होताच मक्याला १४०० ते १५०० रुपये इतका कमी भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. शुक्रवारी बाजारभाव सरासरी भाव १७०० रुपयांपर्यंत होता. सोमवारी भावात एकदम २०० रुपयांची घसरणी कशी होते, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी व्यापाऱ्यांकडे उपस्थित केल्याने बाजार समितीत काही काळ तणावाचे वातावरण होते. संतप्त शेतकऱ्यांनी मका लिलाव बंद पाडून बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या मांडला. लिलाव बंद झाल्याने बाजार समिती यंत्रणेची धावपळ उडाली होती. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळ सत्रात १७५ वाहनांतून मक्याची आवक झाली. मक्याला किमान १३०० कमाल १६८१, तर सरासरी १५६० रुपये इतका भाव मिळाला.प्रशासनासोबत चर्चातब्बल एक तास शेतकरी ठिय्या मांडून बसले होते. त्यानंतर माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करत शेतकरी आणि व्यापारी यांची समितीच्या सभागृहात बैठक घेतली. बाजार समिती प्रशासन, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. चर्चेनंतर दुपारी लिलाव सुरळीत करण्यात आले. अन्य बाजार समित्यांतील मक्याच्या भावांचा आढावा घेऊन मनमाडला भाव देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
मक्याचे भाव घसरल्याने मनमाडला शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:07 PM
मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढल्याने चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा असतानाच सोमवारी (दि. १५) मक्याचे भाव घसरल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. मक्याला १४०० ते १५०० रुपये भाव मिळाला असून, १८५० इतका हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
ठळक मुद्दे१५०० रुपये भाव : लिलाव पाडले बंद; काही काळ तणाव