मेशी : वैशाख महिन्यातील आणि उन्हाळी सुट्टीतील सर्वात मोठा सण म्हणजे अक्षयतृतीया आहे. ग्रामीण भागात या सणाला आखाजी असे म्हटले जाते. परंतु, या सणावर यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असून पाणीटंचाईनेही नागरिक हैराण झाले आहेत.गावोगावी आखाजीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थितीने या सणाच्या आनंदावर विरजन फिरवले आहे. पूर्वी महिला आणि मुलींची गौराईची गाणी जवळपास महिनाभर अगोदर पासून झोक्यावर बसून गायली जायची. या गाण्याच्या चाली सर्वत्र ऐकू येऊ लागल्या की आखाजी सणाची चाहूल लागत असे. उन्हाळ्यात शेतीची सर्व कामे संपलेली असत. याशिवाय मुलांना सुट्टया असल्याने आजोळी किंवा आपल्याच गावी सणाची मजा लुटली जायची. पाणी भरपूर असे त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवायची नाही. मात्र, आता सण साजरा करण्याच्या परंपरेच फरक पडत चाललेला दिसून येत आहे. बागाईती शेतीमुळे कामे वाढली असून मुलांचे देखील सुट्टयांमध्ये वेगवेगळे शिकवणी वर्ग आता सुरू झाले आहेत. गौराईची गाणी म्हणणारा महिला वर्ग कमी कमी होत चालला आहे. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने तर पूर्ण चित्रच बदलले आहे. शहरातील नोकरी व्यवसायासाठी बाहेर गावी गेलेला पुरूष वर्ग देखील आता गावाकडे येणे टाळतो. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने साजरा होणाऱ्या आखाजी सणाची गोडी आता काहीशी कमी होत चालली आहे. त्यातच यंदा दुष्काळाची धग प्रचंड असल्याने शिवाय महागाईही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्याचे सावट या सणावर दिसून येत आहे.आमराई नामशेषनिसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमीच शेतीपिकांना बसत आला आहे. यंदा निसर्गाच्या याच लहरीपणामुळे आमराईवर परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादनावरही परिणाम झाला असून त्याचा फटका आखाजीला बसला आहे. घरोघरी गौराईची स्थापना देखील कमी होऊ लागली आहे. एकेकाळी कसमादे परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा हा सण आता केवळ औपचारिकता ठरत चालला आहे.
आखाजी सणावर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 3:49 PM
अडचणींत वाढ : झोक्यावरची गाणीही विस्मृतीत
ठळक मुद्देग्रामीण भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असून पाणीटंचाईनेही नागरिक हैराण झाले आहेत