नाशिक : मूळच्या बिहार मात्र नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये असलेल्या महिलेस जादूटोण्याची भीती घालून माताजी नावाच्या मांत्रिकाने तब्बल सव्वापाच लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित मांत्रिक महिलेविरोधात फसवणूक तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दिंडोरी येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीत व्यवस्थापकपदी काम करणाऱ्या शायका शमी शाहीन (३३, रा़श्रीजी संकुल, इंदिरानगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार ८ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ०९१६६०१८५४५ या क्रमांकावरून फोन आला़ मै, माताजी बोल रही हूँ, आपको कुछ तकलीफ हंै क्या, हमारे पास उपाय हैं अशी विचारणा समोरील महिलेने केली़ तिला आरोग्याच्या तक्रारीबाबत सांगितले असता समोरील महिलेने फोटो मागितला व त्यानुसार शाहीन यांनी आपला फोटो व्हॉट््सअप केला़
मांत्रिक महिलेने तुझ्यावर जादूटोणा केलेला आहे त्यामुळेच तू व तुझ्या घरातील लोकांना त्रास होतो यामध्ये कोणाचाही जीवही जाऊ शकतो, त्यामुळे तत्काळ पूजा करून घे, असा सल्ला दिला़ माताजीच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने तिने सांगितल्याप्रमाणे स्टेट बँक आॅफ इंडिया व एचडीएफसी बँकेत सांगितलेल्या खात्यावर प्रथम चार हजार ५००, त्यानंतर अनुक्रमे ११ हजार, १ लाख १७ हजार असे १ लाख ३२ हजार पाचशे रुपये भरले़
या मांत्रिक महिलेने ११ व १२ व सप्टेंबर रोजी शाहीन यांना मध्यरात्री व्हिडीओ कॉल करण्यास सांगून भूत, प्रेत, आत्मा अशा गोष्टी सांगून घाबरविले़ यानंतर अजमेर येथील रफीक मौलवीचा मोबाइल नंबर (९९८८८६४४६२) दिला व पुढील पूजा ते करतील, असे सांगितले़ मौलवी सांगतील तसे पैसे भर, हे पैसे काम झाल्यानंतर परत मिळतील, पैसे न भरल्यास ते तुझ्यावरच जादू करतील असे सांगितले़ त्यानुसार मौलवीसोबत संपर्क केल्यानंतर त्याने पूजेच्या नावाखाली सुरुवातीला १ लाख ९० हजार, १ लाख ५० हजार, १ लाख ५४ हजार भरण्यास सांगितले़ त्यानुसार तीन लाख ९४ हजार रुपये विविध बँकांमध्ये भरले़
यानंतर १८ सप्टेंबरला पुन्हा मांत्रिक महिलेचा फोन आला व तिने तुमच्यामुळे मौलवीचा मृत्यू झाला असून, प्रकरण मिटवायचे असेल तर ७ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली़ या प्रकारामुळे घाबरलेल्या शाहीन यांनी हे पैसे भरण्यासाठी अॅड़ शिबिन वर्गीस कंपनीतील जयप्रकाश विश्वकर्मा, मनोज पांडे यांच्याकडे पैसे मागितले़ त्यांनी इतकी रक्कम कशासाठी हवी आहे याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार सांगितला असता शाहीन यांची फसवणूक केल्याचे समोर आले़
याप्रकरणी इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे माताजी व तिच्या दोन साथीदारांचा शोध सुरू केला आहे़