पुरामुळे शेतीचे नुकसानमुसळधार : त्र्यंबकेश्वर, सुरगाण्यात पाऊससुरगाणा : सुरगाणा तालुका पावसाचे माहेरघर आहे याची प्रचिती गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आली आहे. तालुक्यात पाच ठिकाणी बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रांवर सुरगाणा येथे सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. आजपर्यंत तालुक्यात २७४.१२ मि.मी. पाऊस झाला असून, एकूण सरासरी ५४.८२ एवढी झाली आहे.शुक्र वारी मध्यरात्रीपासून जोरदार सुरुवात केलेल्या पावसाने रविवारी दिवसा व रात्रीही मुसळधार बरसणे सुरूच ठेवल्याने सोमवारी (दि. ११) सकाळी ९ वाजेपर्यंत येथील तहसील आवारातील डिजिटल पर्जन्यमापकावर सर्वाधिक १५७ मि.मी. एवढी सुरगाणा येथील पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत सुरगाणा येथे एकूण ४८७.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल बोरगाव येथे १३०.५, तर एकूण पाऊस ३७७.५ झाला आहे. बाऱ्हे येथे ६५.३, तर एकूण १६२.२९, उंबरठाण येथे ५२, तर एकूण १४३ आणि मनखेड येथे ६२.३, तर एकूण १३७.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ११ जुलैपर्यंतचा या पाच ठिकाणचा मिळून तालुक्यात एकूण पाऊस १७४.१२ मि.मी. झाला असून, तालुक्यातील पावसाची सरासरी ५४.८२ इतकी राहिली आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत तालुक्यात एकूण पाऊस ११५.९६, तर सरासरी २३.१९ मि.मी. होती. त्यामुळे पाऊस उशिरा सुरू झाला असला, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी दुप्पट राहिली आहे.सुरगाणा शहरासह तालुक्यात उंबरठाण, बोरगाव, बाऱ्हे, काठीपाडा, आमदा, पळसन या भागात तीन दिवसांपासून जोरदार वृष्टी होत आहे. केम पर्वतरांगेतून उगम पावणाऱ्या नार, पार, वाझडी, उनदा, गिरणा, कादवा, अंबिका या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, या नद्या आठ दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहेत. भाताच्या आवणात पाणी साचल्याने सर्वत्र पाणीच पाणी दृष्टीस पडत आहे. तालुक्यातील बनपाडा, पोहाळी, मोतीबाग आदि ठिकाणी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. शुक्रवारपासून तालुक्यात संततधार सुरू आहे. काही ठिकाणी भाताची लहान कोवळी रोपे पावसाच्या पाण्यात वाहून गेली, तर काही ठिकाणी चिखलाखाली दबली गेली आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. शेतीची कामे ठप्पपेठ : कालपासून कोसळणारा संततधार पाऊस सोमवारी दिवसभर सुरूच राहिल्याने तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे.सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीत कोहोर भागात सर्वाधिक पाऊस पडला असून, २०९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पेठ- १८७.५, तर जोगमोडी परिसरात १६९ मि.मी. पाऊस कोसळला आहे. यामुळे तालुक्यातील धरणांच्या पातळीत झापाट्याने वाढ होत असून, नद्यानाले ओसंडून वाहत आहेत. रविवारी संगमेश्वर, खंबाळे, हातरुंडी, अंबापूर, निरगुडे, कोहोरकडे जाणाऱ्या फरशीपुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असल्याने तीन-चार तास वाहने अडकून पडली होती, तर भुवन घाटात दगडमातीचा भराव खचल्याने काही काळ वाहतूक खोळंबल्याचे सांगण्यात आले.त्र्यंबकेश्वरला मुसळधार त्र्यंबकेश्वर : शहरासह संपूर्ण तालुक्यात सोमवारी सकाळपासून प्रचंड पाऊस कोसळत आहे. तालुक्यातील नदीनाले ओसंडून वाहत असून, गेल्या दोन दिवसात सुमारे ३०८ मि.मि. पाऊस झाला. रविवारीदेखील दिवसभर जोरदार पाऊस कोसळत होता. गेल्या नऊ दिवसांत ६१८ मि.मी. पाऊस झाल्यााची नोंंद झाली आहे. सोमवारी दिवसभरात ४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तहसीलदार कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात एकही नुकसानीची घटना दिवसभरात नोंदविली गेली नव्हती.
पुरामुळे शेतीचे नुकसान
By admin | Published: July 11, 2016 10:48 PM