मुंजवाड : हत्ती व कान्हेरी नदीला चार दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे शेकडो एकर शेती बाधित झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या पिकांची हानी झाली आहे. चार दिवस उलटूनही अजून मुंजवाड शहरात एकही अधिकारी पाहणीसाठी दाखल न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर नवीन बदलून आलेले तलाठी प्रत्यक्ष कार्यालयात अद्याप हजर झाले नाही. फोनवर शेतकऱ्यांनी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.चार दिवसांपूर्वी हत्ती व कान्हेरी नदीला ९ सप्टेंबर ६९ सालच्या पुराची आठवण करून देणारा महापूर या नद्यांना गेला. पुराच्या पाण्याखाली मुंजवाडसह मळगाव, औंदाणे, तरसाळी, औंधाणे, वटार, वनोरी आदि गावांतील नदीकाठावरील शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली गेली होती. यावेळी किती नुकसान झाले याचा अंदाज आला नाही. पूर ओसरल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज आला आहे. नदीकाठाला ज्या शेतकऱ्यांनी मका, बाजरी, डाळींब लावले होते. पुराच्या पाण्याच्या तडाख्यात संपूर्ण पिके जमीनदोस्त झाली आहेत. मुंजवाड येथील शेतकरी सुमन कारभारी जाधव यांच्या मुलाने दोन एकर डाळींबबाग उभी केली होती. येत्या दोन ते अडीच महिन्यानंतर प्रत्यक्ष डाळींब विक्रीसाठी तयार झाले असते. मात्र या पुरात संपूर्ण डाळींबबाग भुईसपाट झाली आहे. लाखो रुपये खर्चून केलेले ठिंबक सिंचनाचे साहित्य या पूरपाण्यात वाहून गेले आहे. फवारणीसाठी असलेला एसटीपी पंपही पुरात वाहून गेला आहे तसेच कारभारी जाधव यांचा दीड एकर मका संपूर्ण पीक वाहून गेले.(वार्ताहर)
पुरामुळे पिकांचे नुकसान
By admin | Published: August 06, 2016 12:21 AM