सिन्नर : रिकाम्या काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटल्याने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर झालेल्या काचेच्या खचामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. वावी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनंतर काचेच्या बाटल्या हटवून महामार्ग झाडून काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावी नजीक मिरगाव फाट्याजवळ सदर अपघात झाला.सिन्नरकडून शिर्डीच्या दिशेने रिकाम्या काचेच्या बाटल्या गोण्यांमध्ये भरुन घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्र. एम. एच. १५ डी. के. ९१२०) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मिरगाव फाट्याजवळ महामार्गावरच उलटला. टेम्पोमध्ये असलेल्या काचेच्या बाटल्या महामार्गावर पडून फुटल्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. के. जगधने, एन. बी. जगताप, जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर साचलेल्या काचेच्या खचामुळे वाहनांना जाणे अवघड झाले होते. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने महामार्ग साफ केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.या अपघातात चालक व अन्य एकजण जखमी झाला. जखमींना शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हवालदार ए. के. जगधने अधिक तपास करीत आहेत.
काचेच्या खचामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 5:44 PM