नाशिक : मुंबईतील एलफिन्स्टनरोड रेल्वेस्टेशनवरील चेंगराचेंगरीची दुर्घटना ही आजवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आली असून, नाशिकमध्येही शहर बस वाहतूक कोलमडलेली असताना प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलेला असल्याचा सूर मूलभूत हक्क आंदोलन व नाशिकमधील अन्य संस्थांनी बोलावलेल्या शोकसभेत उमटला.एलफिन्स्टनरोड रेल्वेस्टेशनवरील फ्लायओव्हरवर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मूलभूत हक्क आंदोलन व नाशिकमधील अन्य संस्था संघटनांतर्फे स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. यावेळी डॉ. डी. एल. कराड, शांताराम चव्हाण, श्रीधर देशपांडे, डॉ. मिलिंद वाघ, मुकुंद दीक्षित, राजू देसले, छाया देव यांनी मनोगत व्यक्त केले. शोकसभेत मूलभूत हक्क आंदोलनासह शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, लोकाधार, दक्षिणायन मानव उत्थान मंच, घंटागाडी कर्मचारी संघटना, लोकनिर्णय, छात्रभारती, महाराष्ट्र युवा परिषद आदी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारच्या दुर्लक्षामुळेच मुंबईत चेंगराचेंगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 1:03 AM