नाशिक - शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव, निफाड, चांदवड, येवला या आठ उपेक्षित तालुक्यातही पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. खरीप हंगामासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पावसामुळे पिकांची चांगली वाढ होते. त्यामुळे नेहमीच दुष्काळाने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. श्रावण महिन्याची सुरुवात होताच, श्रावणी सरी कोसळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातही पावसाने चांगलाच मुक्काम केला आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 90 टक्के तर गंगापूर धरण समूहात 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सोमेश्वर जवळील दूध सागर धबधबा दुथडी भरून वाहू लागला आहे. शुक्रवारी पतेतीच्या सार्वजनिक सुट्टीचे औचित्य साधून पर्यटकांची गर्दी झाली होती. दारणा धरणातूनदेखील विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्येही पावसाने हाहाकार माजला असून नद्यांना महापूर आला आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत 167 जणांचा मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला आहे.