देवगांव : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह संततधारेने देवगांव परिसरातील गाव, वाडे-पाड्यांवर पावसाने दाणादाण उडवली असून, देवगांव येथे काही तासांपूर्वी सुरळीत करण्यात आलेला विद्युत पुरवठा पुन्हा विद्युतवाहक खांब व तारा तुटल्याने खंडित झाला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात मुसळधार पावसासह संततधार सुरू असून, पावसाचा जोर वाढत आहे. पावसामुळे देवगांव परिसरात ठिकठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होणे यासह नदी-नाले, ओहोळांना पूरपरिस्थिती उद्भवून परिसर जलमय झाला आहे. परिणामी, जनजीवन विस्कळीत झाले असून, श्रीघाट - सावरपाडा येथे दरड व भूस्खलन होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात तुफान पावसाने कहर केला असून, तीन दिवसांपासून संततधार आणि धोधो पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र त्रेधातिरपीट उडाली आहे. तर देवगांव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेची संरक्षण भिंत विद्युतवाहक खांबावर कोसळून खांब व विद्युत वाहक तारा तुटल्याने सुरळीत झालेला विद्युत पुरवठा पुन्हा एकदा खंडित झाला असल्याने देवगांवमध्ये काळोख दाटला आहे. तसेच ठिकठिकाणी तारा तुटल्याचे निदर्शनास आले आहे. सकाळी खांब पडलेल्या रस्त्यामध्ये माणसांची वर्दळ नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
-----------------------
देवगांवसह वावीहर्ष, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, चंद्राचीमेट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्ष आदी परिसरात मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाच ते सहा दिवसांपासून रात्रंदिवस सतत पाऊस कोसळत असल्यामुळे आवणा-आवणांमध्ये पाणी साठून देवगांव परिसर जलमय झाला आहे. तसेच मुसळधार पावसासह संततधार सुरू असल्याने घरांच्या छपरातून पाणी झिपरत असल्याने बहुतेक नागरिकांच्या घरांमध्ये ओलावा निर्माण झाला आहे.
--------------------
मोखाडा तालुक्यातील देवबांध-आडोशी रस्ता पाण्याखाली गेला. (२२ देवगाव १)
220721\22nsk_11_22072021_13.jpg
२२ देवगाव १