नाशिक : राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना बेकायदा मंडप उभे करण्यात आल्याबाबत तक्रार असून, नाशिक शहरातील मंडपाच्या प्रश्नावरून महसूल विभाग आणि महापालिका यांच्यात जुंपली आहे. शहरात १०८ बेकायदेशीर मंडप असल्याचा अहवाल महसूल खात्याने शासनाला सादर केला असून, तो उच्च न्यायालयात दाखल झाला आहे; मात्र दुसरीकडे एकही मंडप बेकायदेशीर नसल्याचे महापालिकेच्या प्रशासनाचे म्हणणे असून, तसे पत्र शुक्रवारी (दि. १४) न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्यावर आता १९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.महापालिका हद्दीतील बेकायदेशीर मंडपांचे सर्र्वेक्षण करून मंडपांची माहिती व संख्या कळविण्याचे राज्य शासनाचे आदेश होते. त्यानुसार महसूल खात्याने सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला. त्यात १०८ मंडप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. राज्यातील बेकायदेशीर गणेश मंडपांबाबत उच्च न्यायालयात जनाहित याचिका असून त्याआधारे ही माहिती सादर करण्यात आली आहे. तथापि, महापालिकेच्या म्हणण्यानुसार महसूल खात्याचे सर्वेक्षणच चुकीचे असून, महापालिका आयुक्तांना अडचणीत आणणारे आहे. महापालिकेने यासंदर्भात यादी तपासली असता ९४ मंडपांनी अधिकृतरीत्या परवानगी घेतली असून, तसे पुरावे महापालिकेकडे आहेत, तर उर्वरित मंडप हे खासगी जागेत असून, त्यासाठी महापालिकेच्या परवानगीची गरजच नव्हती असे प्रशासनाचे म्हणणे असून, यासंदर्भातील पत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महसूल विभागाने महापालिकेला विश्वासात न घेता परस्पर हे सर्वेक्षण केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. दरम्यान, यासंदर्भात आता उच्च न्यायालयात बुधवारी (दि. १९) सुनावणी होणार आहे.
बेकायदा मंडपावरून मनपा-महसूलमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:23 AM
राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना बेकायदा मंडप उभे करण्यात आल्याबाबत तक्रार असून, नाशिक शहरातील मंडपाच्या प्रश्नावरून महसूल विभाग आणि महापालिका यांच्यात जुंपली आहे.
ठळक मुद्देन्यायालयात पत्र : बुधवारी सुनावणी