देवळा : तालुक्यातील कणकापूर-मुलूखवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख नंदू जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या कणकापूर-शेरी-मुलूखवाडी या अडीच किमी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून, रस्त्याची खडी वर आल्याने वाहन चालवणे दुरापास्त झाले आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्यादेखील खचल्या आहेत. वार्शी, मुलूखवाडी, हनुमंतपाडा, शेरी आदि गावातील शेतकरी आपला शेतमाल पिंपळगाव (ब) येथील बाजारात नेण्यासाठी कांचनबारीतून वडाळीमार्गे जातात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. खड्ड्यांमुळे ट्रॅक्टर, पिकअप आदि वाहने नादुरुस्त होतात. यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वेळेवर मार्केटमध्ये पोहोचविण्यास उशीर होऊन त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. परिवहन महामंडळाच्या दोन बस याच रस्त्याने प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या परिसरातील दुचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
कणकापूर-मुलूखवाडी रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: November 26, 2015 11:47 PM