नाशिक : शैक्षणिक, नोकरी तसेच राजकीय कारणांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. वर्षभरही ही प्रक्रीया सुरूच असल्याने जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात सातत्याने प्रकरणे दाखल होत अससात. येथील प्रकरणांची मंजुरी तसेच त्रुटी असलेल्या प्रकरणांबाबत समितीकडून अनेकविध कारणे सांगितली जातात. त्याविषयीच्यादेखील तक्रारी आहेत. मात्र असे असले तरी कामाचा व्याप पाहता या ठिकाणी पुरेपूर मनुष्यबळ असणे अपेक्षित आहे. कमी मनुष्यबळ असल्याने कामांची गती कमी होणे आणि पर्यायाने यंत्रणेवर ताण येण्याचे प्रकार घडत आहेत.
जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडे येणाऱ्या प्रकरणांची संख्या पाहता येथील कर्मचाऱ्यांना सातत्याने काम करावे लागते. अनेक कसोट्यांवर प्रकरणांची पडताळणी करावी लागत असल्यामुळे मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असते. असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्यावरही ताण येतो. याचा नकळत परिणाम प्रकरणांच्या गतीवरदेखील होत असतो. येथील कामकाज आणि प्रकरणे मंजुरीच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांकडून नेहमीच शंका उपस्थित केली जाते. बाह्य व्यक्तीच्या हस्तक्षेपाच्या अनेक तक्रारीदेखील पालकांनी केलेल्या आहेत. काही राजकीय नेत्यांकडूनही याबाबतच्या तक्रारी अनेकदा करण्यात आलेल्या आहेत.
प्रकरणांची दिरंगाई ही येथील दाखल प्रकरणे, मनुष्यबळावरच अवलंबून आहे. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ मिळाली तर कामकाजात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. या कार्यालयात केवळ दोन क्लर्क असून, त्यातील एक दीर्घ वैद्यकीय रजेवर आहे. इतर दहा कर्मचारी हे करारातील कर्मचारी आहेत. या कार्यालयाचा व्याप लक्षात घेता अधिक मनुष्यबळाची गरज आहे.