सिडको : महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील विविध भागात रोज दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक या भागात दूषित पाणीपुरवठा होत असून, त्यापाठोपाठ आता लोकमान्यनगर, राजरत्ननगर व उत्तमनगर भागांतही दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात तक्रार दिल्यानंतरही स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर सोमवारी (दि.२३) प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे, छाया देवांग तसेच रमेश उघडे, दिलीप देवांग यांनी दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागात पाहणी केली असता यावेळी नागरिकांनी दूषित पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. यानंतर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ काम सुरू केले. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोच आता प्रभागातील लोकमान्यनगर, राजरत्ननगर व उत्तमनगर भागातही दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी नगरसेवक नीलेश ठाकरे याच्याकडे केली. नगरसेवक ठाकरे यांनी येथील परिसरात पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिक रंजना जाधव, मनीषा भामरे, मीना गायकवाड, अलका जाधव, वंदना चौधरी, सुदर्शन पवार, स्वप्नील वाघ, गणेश वाणी, चंद्रकांत राऊत यांनी तक्रार करीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नगरसेवक नीलेश ठाकरे यांच्याकडे केली. प्रभाग २९ मध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असताना याबाबत मनपा अधिकाºयांना गांर्भीयच नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक याबाबत वारंवार तक्रारी करीत असतानाही याकडे लक्ष दिले जात नसल्याने यापुढील काळात नागरिकांनाच बरोबर घेऊन मनपा कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. - नीलेश ठाकरे, नगरसेवक, प्रभाग २९
नियोजनशून्य कारभारामुळे लोकमान्यनगरात दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:58 PM