सिडको : महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील काही भागातील नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे प्रभाग क्रमांक २७ मधील सिंहस्थनगर भागासह परिसरात सकाळच्या वेळेला तब्बल पाच ते सहा तास पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी होत असून, यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यातच नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला देण्याबाबत विचार सुरू आहे. सिडको विभागाचाच विचार केला तर सिडकोतील काही भागात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. मात्र, याच सिडको भागातील सिंहस्थनगर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सकाळी पाच ते सहा तास पाणीपुरवठा सुरू असल्याने मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याआधीदेखील सिडकोतील दत्त चौक, महाकाली चौक व परिसरात अनेक दिवस गढूळ व दूषित पाणीपुरवठा झाल्याची घटना ताजी असताना आता सिंहस्थनगर भागातील पाणी प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. सकाळी येणारे पाणी पाच ते सहा तास सुरूच राहत असून, नागरिकही पाण्याचा अपव्यव करताना दिसून येत आहे. यामुळे परिसरातील मुख्य रस्त्यावरदेखील पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.
महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोत पिण्याचे पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:07 AM