नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बंद लिफ्टमुळे गर्भवती महिला पोर्चमध्येच प्रसूती झाल्याची घटना रविवारी (दि़१६) सकाळच्या सुमारास घडली़ जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व आहार विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी तत्काळ आडोसा करून गर्भवतीची मदत केली़ या महिलेने गोंडस बाळास जन्म दिला असून दोघेही सुखरूप आहेत़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील बंद लिफ्टमुळे रुग्णालयीन प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे़
रुग्णालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील खांडगाव येथील सुगंधा भावराव जाधव (२६) या गर्भवती महिलेस रविवारी सकाळी शिंपी टाकळी येथून १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते़ स्ट्रेचरवर असतानाच सुगंधा जाधव यांना प्रसूती कळा सुरू झाल्याने तत्काळ पहिल्या मजल्यावरील प्रसुती कक्षात दाखल करणे गरजेचे होते़ त्यांना पहिल्या मजल्यावर नेण्यासाठी लिफ्टजवळ नेले असता पोर्चमधील दोन्ही लिफ्ट बंद होत्या़ दरम्यान, याचवेळी जाधव यांची प्रसूती झाली व त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला़
आहार विभागातील कर्मचारी शिला कांबळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धावपळ करून बाळंतिणीस सावरले़ तसेच शेजारील आपत्कालीन कक्षातील परिचारीकांना आवाज देऊन या ठिकाणी असलेल्या पुरुषांना बाहेर काढून पोर्चचे दोन्ही गेट बंद करून बाळंतिणीस आडोसा केला़ यावेळी परिचारिकांनी गोंडस बाळ व जाधव यांच्यावर उपचार केले़ तर वॉर्डबॉय यांनी झोळी करून जाधव यांना प्रसूतीकक्षात दाखल केले़ जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व धावपळ करणा-या कांबळे यांचे जाधव यांनी आभार मानले़