लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी (भगवान गायकवाड) : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गाव पाड्यावर आजपर्यंत शासनाच्या विविध योजनांमधून नळपाणी पुरवठा योजना झाल्या, मात्र काही गावांमधील योजना सदोष झाल्याने व विजेच्या भारनियमनामुळे येथील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्व गावांमध्ये योजना असताना काही गावांमध्ये योजना होताना सदोषचे ग्रहण लागल्याने उन्हाळ्यात विहीर अधिग्रहणाची वेळ येत आहे.
दिंडोरी तालुक्यात आजमितीस टंचाईग्रस्त म्हणून एकही गाव पाडा नाही. प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची सोय असून, जलस्वराज्य योजना, भारत निर्माण योजना, जलजीवन मिशन आदी पाणीपुरवठा विभागांच्या प्रत्येक योजनेचे काम तालुक्यात झाले आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी या योजना पूर्णपणे यशस्वी झालेल्या नाहीत. दहिवी येथे तीन योजनांच्या टाक्या आहेत, परंतु तरीही येथे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत असून, गावाबाहेर हातपंपावर महिलांची कायम गर्दी असते. भारत निर्माण योजनेचा तर पुरता बट्ट्याबोळ झाला असून, यातील भ्रष्टाचाराने थेट काही योजनेच्या कारभाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होत पोलीस कोठडीची हवाही खावी लागली आहे. तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने मंडकीजाम, इंदोरे, जांबुटके आदी काही योजना लाखो रुपये खर्च करून केल्या आहेत. मात्र, त्या चालूच झाल्या नसल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
--------------
तीन गावात विंधन विहिरींचे प्रस्ताव
प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना होत विविध गावात नळपाणी पुरवठा झाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी त्याला गळती लागली असून, वेळीच दुरुस्तीअभावी महिलांना पाणवठ्यावर जाऊन पाणी आणावे लागत आहे. विजेच्या खेळखंडोब्यामुळे पाणी वितरणावरही परिणाम होत आहे. भारनियमन व कमी दाबाने वीजपुरवठा झाल्यास पाणी वितरणात अडचणी येत आहेत. गेल्यावर्षी तालुक्यात एकाही टँकरचा प्रस्ताव नव्हता तसा तो यावर्षीही नाही. गेल्यावर्षी आठ गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या विहिरींनी तळ गाठल्याने विहीर अधिग्रहण करावे लागले होते. यंदाही निचाईपाडा व शिवारपाडा येथे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आले असून, तीन गावांकडून नवीन विंधन विहिरींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांना गळती लागली असून, त्या दुरुस्त किंवा नव्याने करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी पाठवले असून, जलजीवन मिशन अंतर्गत विविध गावांमध्ये कामे प्रस्तावित आहेत.
-------------------
दिंडोरी तालुका एकूण हातपंप ४३५
नळपाणी पुरवठा योजना १५७
मागील वर्षी विहीर अधिग्रहण गावे ८
यावर्षी विहीर अधिग्रहण प्रस्ताव २
गावे नवीन विंधन विहीर प्रस्तावित गावे ३