नाशिक : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने माझ्या अवघ्या सहा महिन्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीचे अवलोकन करून उत्कृष्ट संसद पुरस्कारासाठी देशपातळीवर माझी निवड केली. दिल्लीत झालेल्या या सोहळ्यामुळे आपली देशात ओळख तर झालीच, शिवाय भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनीही या निमित्ताने माझे गुण हेरले. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली, अशा शब्दांत डॉ. भारती पवार यांनी कृतज्ञतेची भावना ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा झाला. डॉ. भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्यापूर्वी ‘लोकमत’ समूहाच्या वतीने सन २०१९ मध्ये लोकसभेत मतदारसंघाचे प्रश्न मांडून, त्याचा हिरिरीने पाठपुरावा करणाऱ्या देशपातळीवरील उत्कृष्ट खासदारांचा शोध घेतला असता, त्यात डॉ. भारती पवार यांची निवड करण्यात आली. दिल्लीत झालेल्या या सोहळ्यात त्यांना ‘उत्कृष्ट संसद सदस्य’ म्हणून गौरविण्यात आले होते. त्याची आठवण ठेवून विजय दर्डा यांनी आवर्जून डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी आवर्जून ‘लोकमत’कडून मिळालेल्या पुरस्काराची आठवण करून देत हा पुरस्कारच खऱ्या अर्थाने मला अधिक काम करण्याची प्रेरणा व आशीर्वाद देऊन गेल्याचे सांगितले. ‘लोकमत’च्या पुरस्काराची दखल आपल्या केंद्रीय मंत्रिपदासाठी अधिक फायदेशीर ठरली असून, लोकमतचे ऋण आपण कधीही विसरू शकणार नसल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री पदी विराजमान होऊनही डॉ. भारती पवार यांनी ‘लोकमत’च्या पुरस्काराची आठवण ठेवल्याबद्दल विजय दर्डा यांनाही काहीसे आश्चर्य वाटले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन ‘लोकमत’ नेहमीच आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही विजय दर्डा यांनी दिली. लोकमतच्या ‘रक्ताचे नाते’ या रक्तदान अभियानाला शुभेच्छा देत नागरिकांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी यावेळी केले.