मालेगाव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल वाढवून द्यावे, महामंडळाकडून घेतलेली कर्ज सरसकट माफ करावीत, महामंडळाने १ लाख रुपये अनुदान द्यावे, प्रशिक्षण वर्ग चालु करावेत यासह विविध मागण्यांप्रश्नी सोमवारी येथील मातंग सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.तालुक्यातील मातंग समाजाची आर्थिक उन्नती रखडली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल १ हजार कोटी रुपयांनी वाढवून द्यावे, जेणे करुन मातंग समाजातील वाढत्या लोकसंख्येला याचा लाभ होईल. पात्र लाभार्थ्यांनी घेतलेले कर्ज सरसकट माफ करावे व विनाअट नवीन कर्ज उपलब्ध करुन द्यावे, महामंडळाचे अनुदान १० हजारावरुन १ लाख रुपये करावेत, १० हजारात कुठलाही व्यवसाय होत नाही. वाढत्या महागाईचा विचार करुन १ लाख रुपये अनुदान देण्यात यावे, कर्ज प्रकरण मंजुर करताना महामंडळाने जामीनदारांची मागणी केली जाते मातंग समाजाची हालाखीची स्थिती आहे. जमिनी नसल्याने जामिनदार होता येत नाही. जामिनदाराची अट शिथिल करावी, मातंग समाजातील नागरिकांना अंत्योदय शिधापत्रिका उपलब्ध करुन द्यावी, शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे यासह विविध मागण्यांप्रश्नी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मातंग सेवक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन छेडले होते.या आंदोलनात राज्याध्यक्ष संजीवन वाघ, दगा अहिरे, अरुण नवगिरे, सुरेश वाघ, लक्ष्मण खैरनार, नानाजी अल्हाट, दीपक शिरसाठ, जगन जगधान, बापु चव्हाण, किशोर पगारे, नाना लोणारे, सुधीर जाधव, सचिन रुक्षे, कृष्णा लोंढे आदिंसह महिला सहभागी झाल्या होत्या.
मालेगावी मातंग सेवक संघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 2:17 PM