वडझिरे : नवीन बंधारे बांधणीच्या तुलनेत केवळ १० टक्के इतका खर्च करून जुन्या बंधाºयांची दुरुस्ती केली तर जलसाठ्यात वाढ होण्यास मोठा हातभार लागू शकतो. एकजूट आणि लोकसहभागाच्या बळावर वडझिरे गावाने अशा जलसंधारणाच्या कामांचा ‘आदर्श नाशिक पॅटर्न’ निर्माण केला आहे. हा नाशिक पॅटर्न राज्यभरात राबवून सुमारे ७५ हजार जुने बंधारे दुरुस्त करून पाणीसाठा वाढवण्यास मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून खोलीकरण केलेल्या गावबंधाºयांचे लोकार्पण व फार्मस् प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन डवले यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी, पंचायत समिती सभापती सुमन बर्डे, नगराध्यक्ष किरण डगळे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, संग्राम कातकाडे, उदय सांगळे, सागर शिंदे, रत्नाकर पगार, भारत धिवरे, वनक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, अरुण दातीर, सरपंच संजय नागरे, उपसरपंच छाया नागरे आदी उपस्थित होते. गेल्या वर्षी वडझिरे गावात जलयुक्तच्या कामांचा फक्त ट्रेलर पाहिला होता. यंदा मात्र संपूर्ण चित्रपट दिसत असल्याचे आमदार वाजे म्हणाले. जलसमृद्ध झालेले वडझिरेकर एका उंचीवर पोहचले आहे. आणखी उंचीवर जाण्यासाठी वृक्षारोपण, स्वच्छतेसह नवनवीन संकल्पना राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी उदय सांगळे, सुनील पोटे, अनिल लांडगे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.वडझिरेकरांनी सजविलेल्या बैलगाडीतून मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, आमदार राजाभाऊ वाजे यांची वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली. डोक्यावर जलकलश घेतलेल्या महिला, भजनी मंडळ व परिसरातील ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते. अर्जुन बोडके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रमेश डोमाडे, बाबजी पाटील, कैलास गिते, भगवान बोडके, नवनाथ गामणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. भीमराव दराडे यांनी आभार मानले.
नाशिक पॅटर्नमुळे पाणीसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:15 AM