लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : एकविसाव्या शतकात माणूस उत्तरोत्तर प्रगती करत असला तरी ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा पाळली जात असून, त्याला बळीराजादेखील अपवाद ठरलेला नाही. नवीन वर्षातील सणाची सुरूवात करणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त येणाऱ्या अमावास्या, भोगी व करीदिनामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. संक्रांतीच्या सणामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवकच झाली नसल्याने बाजार आवार ओस पडले आहे.
बुधवारीही अमावास्येचा अंमल असल्याने बाजाराच्या दिवशीदेखील बाजार समितीत केवळ बटाटा व लसूण विक्रीसाठी आले होते. तर बहुतांशी कांदा आडतदार व व्यापाऱ्यांची शटर डाऊन असल्याचे दिसून आले. कांदा बाजारभाव टिकून असला तरी, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने कांद्याचे दर अजून वाढतील, अशी शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला नाही, असे कारण सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मंगळवारी आलेली अमावास्या त्यानंतर बुधवारच्या दिवशी संक्रात भोगी असल्याने वाहनचालकदेखील मालवाहतूक करण्यासाठी नकार देतात.
त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला नाही. नववर्षातील पहिलीच अमावास्या त्यात संक्रांत व त्यानंतर कर आल्याने नवीन वर्षात आर्थिक व्यवहारावर संक्रांत येऊ नये तसेच व्यवहार करताना काही वाद झाले तर नववर्षाच्या प्रारंभीपासून कटकट मागे लागायला नको, या अंधश्रद्धेच्या भावनेतून मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला नसल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी खासगीत दिली. गुरुवारी मकर संक्रांत व त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी कर असल्याने अजून तरी दोन दिवस बाजार समितीतील कांदा बाजारात आवक होण्याची शक्यता कमीच असल्याचे बाजार समिती सुत्रांनी सांगितले.
इन्फो बॉक्स
अंधश्रद्धेचा बाजार
अमावास्येच्या दिवशी दर महिन्याला जिल्ह्यातील काही ठिकाणी असलेल्या बाजार समितीत कांदा व्यवहार पूर्णपणे बंद असतात. संक्रांतमुळे जिल्ह्यातील वणी येथील कांदा मार्केट शनिवारपर्यंत तर अमावास्येच्या दिवशी लासलगाव येथील कांदा मार्केट देखील बंद राहात असल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले. अमावास्या तसेच मकर संक्रांत, भोगी, कर यादिवशी कांदा बाजारात कांद्याची आवक होत नसल्याने बळीराजादेखील अंधश्रद्धेच्या बाजारात गुंफला गेल्याचे म्हटले जात आहे.