लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने एका गरीब व आदिवासी महिलेला आपले तिळे गमवावे लागले असल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावच्या रायपाडा या आदिवासी पाड्यात घडली. या दुर्दैवी महिलेचे नाव संगीता पांडू वारे (२७) असे आहे. ही गरोदर महिला तीन दिवसांपासून अडली होती. तिला वैद्यकीय सेवेची तातडीने आवश्यकता होती. वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी तिच्या कुटुंबीयांचा सतत संपर्क सुरू होता. पण देवगाव उपकेंद्रात कुणी कर्मचारी नसल्याने वैद्यकीय सुविधा मिळालीच नाही. शेवटी अंगणवाडी सेविकेच्या मदतीने या महिलेने तिळ्या मुलांना जन्म दिला. पण या तीनही बाळांना वैद्यकीय उपचारांची गरज होती. तीनपैकी एका बाळाचा जन्मताच मृत्यू झाला. दरम्यान, ही खबर श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांच्यापर्यंत पोहचली. ते तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना भ्रमणध्वनी करून घटनेचे गांभीर्य कळविले. त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी योगेश मोरे यांना कळविले. मोरे यांनी रु ग्णवाहिका पाठवून जिल्हा रुग्णालयात नेण्याचे ठरविले. पण दरम्यान दुसरी दोन बालकेही मरण पावली. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर या बाळांचा जीव वाचला असता, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र मोठेदेवगाव हे उपकेंद्र अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेले असून, अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र फार मोठे आहे. डहाळेवाडी येथे नव्याने मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वांना सोयीचे राहील. तातडीने ते अंमलात आणून सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आज ती महिला तिच्या तीन बाळांना मुकली ती केवळ वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्यामुळेच ! तथापि, स्वत: त्या महिलेलादेखील वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. यासंदर्भात उद्या श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
वैद्यकीय मदत न मिळाल्याने नवजात तिळ्यांचा मृत्यू
By admin | Published: May 19, 2017 12:35 AM