त्र्यंबकेश्वर/वसंत तिवडे : राम फाउंडेशनच्या पुढाकाराने ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करु न लोकसहभागातून माळेगावच्या दिव्याचा पाडा येथील पाणी टंचाईचे संकट दूर केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गावापासुन सुमारे एक दिड कि.मी.अंतरावरील विहीरीचे पाणी किमान एप्रिल ते मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी पुरते. त्या विहीरीवर पंपिंग मशीन लावून प्रथम पाणी खेचण्याची सोय केली. विहीरीपासुन गावापर्यंत ग्रामस्थांनी श्रमदानातून जलवाहिनीसाठी खोदाई केली. राम फाउंडेशनने विहीरीपासुन गावापर्यंत जलवाहिनी टाकुन टाकीपर्यंत गावात पाणी आणले. विद्युत व्यवस्था गावातील पाणी वितरण व्यवस्था ग्रामपंचायतीने तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतुन केले. त्यामुळे गावावरील पाणी टंचाई दुर झाली. दिव्याचा पाडा आदिवासी पाडे या गावची कहाणीच मुलखावेगळी आहे. इथे ऊन्हाळ्यात दिड किलोमीटरवर का होईना पण दरीतील विहीरीत पाणी मिळते. परंतु पाऊस प्रचंड पडुनही पावसाळ्यात मात्र पाण्यासाठी चिखल तुडवत रानातील झ-यावर फिरावे लागत होते. पायवाटेवरचे खड्डे, खोल दरीतली विहीर आणि पावसाळ्यात पाण्यासाठीची जीवघेणी कसरत करावी लागत होती. त्यावर ग्रामसेवक मनोहर गांगुर्डे यांनी उपाय शोधत महिलांमध्ये जनजागृती करत एकत्र आणले. जवळच्या नाल्यात छोटे छोटे बंधारे बांधले. त्यातील विहिरीला पाणी वाढले. त्यानंतर तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, वाघेरा येथील सरपंच जयराम मोंढे आदींनी राम फाऊंडेशनच्या रामचंद्र धामणे यांच्याशी चर्चा करु न दिव्याचा पाडा टंचाई मुक्त करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर गावक-यांशी चर्चा करु न पाणी प्रश्न त्वरीत सोडवण्याचा निर्णय घेत काम सुरु केले. अट एकच होती. गावक-यांनी श्रमदानातुन जलवाहिनी साठी खोदाई करु न द्यावी. गावक-यांनी ते मान्य केले. आणि खोदाईचा प्रश्न मिटला. याप्रसंगी गावातील महिलांच्या हस्ते नळ चालू करु न पाणी प्रकल्प सुरु करण्यात आला. दिव्याचा पाडा गाव टँकरमुक्त करण्यासाठी निवृत्त अधिकारी आपल्या स्वखर्चातून करावे ही घटना ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य इंजि. रु पांजली माळेकर यांनी केले.
लोकसहभागातून दिव्याचा पाडा येथील पाणीटंचाई दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 1:10 PM