नांदगाव : पावसामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या इसमाकडील ८० हजार रुपये चोरी करून पळून जात असलेल्या चार दुचाकी चोरांचा शिताफीने पाठलाग करून दोघांना शुक्रवारी दुपारी दीड वाजता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नांदगाव गंगाधरीनजीक टोलनाका येथे निवाऱ्याला थांबलेल्या फिर्यादी सुरेश बाळाजी चव्हाण रा. हमालवाडा ठिकाणी दोन दुचाकीस्वार गेले व म्हणाले आम्ही पोलीस आहोत. चोर तुम्हाला चाकू सुरा दाखवून तुमची लूट करतील. तुमच्याकडील पैसे आमच्याकडे द्या, असे म्हणत सुरेश चव्हाण यांच्या खिशात हात घालून ८० हजार रुपये चौघांनी मिळून बळजबरीने हिसकावले व दुचाकीवरून पसार झाले. फिर्यादीने एका दुचाकीचा नंबर बघितला होता. त्यांनी मुलगा आकाश चव्हाण यास फोनवर कळविले, त्यावेळेला मुलगा हा घटनास्थळापासून जवळ ग्रामीण रुग्णालयाजवळ होता. वेगाने जाणारी दुचाकी त्याच्या नजरेस पडली आणि त्याने तिचा आपल्या दुचाकीवरून पाठलाग केला. रेल्वे बोगद्यातून जात असताना त्या चोरट्यांना गाठले. चोरट्यांनी आकाशच्या दुचाकीला कट मारून खाली पाडले व पाठलाग करू नये म्हणून कुकरी कोयता काढून त्याच्यासमोर फिरवला व तेथून पळ काढला. यावेळी चोर चोर ओरडल्याने चोर रस्ता चुकले व गारेवाडा वस्तीकडे वळले. तेथे चोरांची एक दुचाकी घसरली व ते पडले. यावेळी तेथे असलेल्या ग्रामस्थांनी आकाशला मदत केल्याने दोघे सापडले. दोन पसार झाले.
----------------------------
दोघांना पोलीस कोठडी
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर, सुख्राम सावकारे, अनिल शेरेकर यांनी विलंब न लावता घटना स्थळ गाठले व दोन चोरांना ताब्यात घेतले. दुपारी दीड वाजता घटना घडली. संशयित अमजदअली बरकतअली बेंग, बरकत शहिदुल्ला जाफरी ( मिर्झा गुलाब ) रा. भिवंडी ठाणे यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयाने १४ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखली सुरू आहे.