वणी : सप्तशृंगगडावर दुपारी ४ वाजता जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने भाविकांची तारांबळ उडाली. सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत असताना दुपारी पावसास प्रारंभ झाला. सुमारे ३५ मिनिटे जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटर अंतरातील एसटी बसेसची वाहतूक मंदावली. आज शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस असल्याने सप्तशृंगीच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून वर्दळ होती.पावसाचा जोर पाहता संरक्षणासाठी दुकाने, पार्किंग, घरांचे ओटे यांचा आश्रय भाविकांना घ्यावा लागला. पावसाने विश्राती घेतल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी भाविकांनी बसस्थानक गाठले. दरम्यान, वणी व परिसरातही तुफान पाऊस पडल्याने जगदंबा देवी मंदिर परिसरातील घटी बसलेल्या महिला भाविकांचीही तारांबळ उडाली. नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमेनंतर सप्तशृंगगड धुण्यासाठी पाऊस येतो हा प्रतिवर्षीचा अनुभव; मात्र दुसऱ्याच माळेला पर्जन्यराजा मनमुराद बरसला. पावसाच्या विश्रातीनंतर दर्शनासाठी पुन्हा रांगा लागल्या होत्या. पावसामुळे व्यावसायिकांना फटका बसला, तर अनपेक्षित गर्दी वाढल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रतिकूल परिणाम झाला.१२ वाजेच्या सुमारास भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने रांगा लावण्यात आल्या होत्या. गडावर सुमारे ७० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावल्याची माहिती देण्यात आली. दर्शनासाठी भाविकांचा उत्साह असताना पर्जन्यराजाचे आगमन झाले. अनपेक्षित पडलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली.
पावसामुळे गडावरील भाविकांची तारांबळ
By admin | Published: October 02, 2016 11:02 PM