क़ का़ वाघ महाविद्यालयाजवळील प्रकार : वाहतुकीचा खोळंबाकोणार्कनगर : धक्का मारल्याच्या कारणावरून दुचाकीधारकांनी परिवहन महामंडळाच्या बसचालकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी क़ का़ वाघ महाविद्यालयाजवळ घडली़ या घटनेमुळे महामार्गावर सुमारे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पालघर-शिरपूर (एमएच २०, बीएल २७३७) ही परिवहन महामंडळाची बस नाशिककडे येत होती़ या बसचा दुचाकीला (एमएच १५, डीडब्ल्यू ४७६०) धक्का लागल्याच्या कारणावरून बसचालक दुर्गेश कोळी यांना दुचाकीस्वार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण करून पळ काढला़ या मारहाणीत बसचालक कोळी हे बेशुद्ध झाले़बसचालक कोळी हे बसमध्येच बेशुद्ध पडल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली़ या घटनेची माहिती वाहतूक पोलीस संजय वाघमारे यांना मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून कोळी यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले़ बसचालकाला मारहाण होत असताना महाविद्यालयीन विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील युवकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे़ (वार्ताहर) प्रवासी वेठीसया घटनेनंतर परिवहन महामंडळाकडून बदली चालक न दिल्यामुळे बसमधील प्रवाशांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले़ यानंतर बऱ्याच वेळाने दुसऱ्या खाली जागा असलेल्या बसेसमध्ये प्रवाशांना बसविण्यात आले़ महामंडळातील बसचालक, बसवाहक यांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ या मारहाणीविरोधात कामगार संघटना एकत्रितपणे आवाज उठवून मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.- प्रमोद भालेकर, सचिव, महाराष्ट्र कामगार संघटना