साकोरा : परिसरातील नवादे शिवारात दुपारी शॉर्टसर्किटमुळे खुडलेली तीन एकर मका कणीस व चारा जळून खाक झाला. या संदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह तलाठी यांनी पाहणी करून पंचनामा केला.अनेक वर्षांपासून शेतमळ्यात वीजतारांची झोळी झालेली असताना याबाबत शेतकऱ्यांनी दुरूस्तीची मागणी केली आहे. मात्र महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारी नवादे शिवारातील गट नंबर ८८२ मधील कांतिलाल व्यंकट बोरसे यांनी मोठ्या मेहनतीने तीन एकर शेतात मका लागवड केली. त्यानंतर मजुरांकडून कणस मोडून संपूर्ण वावरात चारा व कणस पडलेले होते. दुपारी अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे दोन तारांमध्ये घर्षण झाल्याने आगीचे लोळ खुडलेल्या कणसांवर व चाऱ्यावर पडल्याने चारा व कणसांनी पेट घेतला. काही वेळातच संपूर्ण मका कणीस व चारा भस्मसात झाला. संबंधित शेतकऱ्याला काहीच करता आले नाही. यासंदर्भात वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व तलाठी कपिल मुत्तेपवार, अनिल हिरे यांनी पंचनामा करून शंभर क्विंटल मका व तीन ट्रॅक्टर चारा जळाल्याची नोंद केली आहे. (वार्ताहर)
शॉर्टसर्किटमुळे तीन एकर मका कणसासह जळून खाक
By admin | Published: October 30, 2016 2:18 AM