नाशिक : वाहतूकदारांच्या संपामुळे औद्योगिक क्षेत्रासह स्थानिक बाजारपेठाही प्रभावित झाल्या आहेत. नाशिकमध्ये सध्या ड्रायफ्रु टचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुका मेवा खरेदी करून साठवणूक करणे अतिशय महागडे व जिकिरीचे असल्याने व्यापारी मागणीच्या प्रमाणात गरजेपुरताच माल उचलतात. त्यामुळे संपकाळात शहरातील ड्रायफ्रुट विक्रेत्याचा माल संपत आला असताना त्यांनी यापूर्वीच्या साठ्यावर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी कशीबशी पूर्ण केली असली तरी पुढील एक-दोन दिवसांत शहरात सुक्यामेव्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शुक्रवारपासून (दि.२०) पुकारलेल्या देशव्यापी संपाला चार दिवस पूर्ण झाल्याने औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानंतर स्थानिक बाजारपेठेलाही संपाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. आषाढी एकादशी व आगमी श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुक्यामेव्याला मागणी वाढलेली असताना नेमक्या याच मालाचा शहरात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपामुळे नाशिकमध्ये सुक्यामेव्याची सुमारे ९० टक्के आवक घटलेली असताना आषाढी एकादशीमुळे सुके अंजीर, खजूर व बदाम, अक्रोड, काळ्या मनुका, केशर, खारीक, काजू, तीळ, जर्दाळू अशा विविध पदार्थांना मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांकडे असलेल्या साठा कमी झाला असून, पुढील एक-दोन दिवसांत सुक्यामेव्याची वाहतूक सुरू झाली नाही तर शहरात तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, जिरा, धने, मिरची, लवंग, मोहरी, ओवा अशा मसाल्याच्या पदार्थांचाही बाजारात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता काही व्यापºयांनी व्यक्त केली आहे. परंतु, अनेक ग्राहक मसाल्याचे पदार्थ वर्षातून एकदाच खरेदी करीत असल्याने मसाल्याच्या पदार्थांची कमतरता तीव्रतेने जाणवणार नसल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे. नाशिकमध्ये नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात सुकामेवा येतो. त्यापैकी जवळपास ९० टक्के मालाची वाहतूक थांबली असून, पुढील एक-दोन दिवसांत सुक्यामेव्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सुकामेवा किमतीने महागडा असून, व्यापार रोखीत करावा लागतो. त्याचप्रमाणे साठवणुकीसाठी चांगली यंत्रणा गरजेची असल्याने मोठ्या प्रमाणात साठा करणे शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे ही टंचाईसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. - महेश ठक्कर, नाशिक गुड्स
वाहतूकदारांच्या संपामुळे बाजारात ड्रायफ्रुटचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:57 AM