नाशिक : जिल्ह्यात विविध संघटनांनी बुधवारी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व नव उदार आर्थिक धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात देवळा तालुक्यातील नगरपंचायत कामगार कर्मचारी संघटना, महसूल विभागाचे कर्मचारी, विविध शेतकरी संघटना आदींनी पाठिंबा देत कामबंद आंदोलन केले. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा केंद्र शासनाविरोधी घोषणा देत विडी कामगारांनी सिन्नर शहरआणि परिसर दणाणून सोडला. देशव्यापी संपाचे औचित्य साधून विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयटकच्या सिन्नर तालुका विडी कामगार संघटना, पेन्शनर संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. ८) सिन्नर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सिन्नर : विडी कामगारांना कमीत कमी ९ हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करावा, धूम्रपानविरोधी कायद्यातून तंबाखू व विडी धंद्याला वगळून या व्यवसायाला देशपातळीवर केंद्र सरकारने संरक्षण द्यावे यांसह विडी बंडलवर ८५ टक्के धोका चित्र छापण्याची अट शिथिल करावी, विडी उद्योगाला लागू केलेला २८ टक्के जीएसटी कर केंद्र शासनाने कमी करून तो ५ टक्के करावा, विडी कामगारांच्या मुलींच्या लग्नाकरिता कन्यादान म्हणून १ लाख रुपये भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाकडून अर्थसाहाय्य मिळावे आदी मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता.सिन्नरला आयटकच्या तालुका विडी कामगार संघटनेच्या वतीने शहरातील कामगार चौकातील कार्यालयाच्या प्रांगणात दुपारी १ वाजेच्या दरम्यान कामगार एकत्र आल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. दत्ता निकम, राज्य सचिव कॉ. राजू देसले, तालुकाध्यक्ष म्हाळू पवार, जनरल सेक्रेटरी नारायण आडणे, सहसेक्रेटरी रेणुकाताई वंजारी, बालाजी साळी आदींनी यावेळी विडी कामगारांना मार्गदर्शन केले.मोर्चात लक्ष्मण पालवे, संगीता पाटोळे, पुष्पा घोडे, शोभा आहेर, शांताराम रेवगडे, भाऊ झगडे, मैना कोळसे आदींसह विडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली.निष्ठा प्रशिक्षणार्थींचा सहभागमुसळगाव : सिन्नर तालुकास्तरीय निष्ठा (मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी एकात्मिक प्रशिक्षण कार्यक्रम) प्रशिक्षणार्थींनी दि. ८ जानेवारीच्या देशव्यापी संपात सहभाग नोंदविला. येथील सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये निष्ठा प्रशिक्षणाचा चौथा टप्पा सुरू आहे. याठिकाणी प्रशिक्षणातील सर्व शिक्षकांनी प्रशिक्षण आॅनलाइन असल्याने काळ्या फिती लावून देशव्यापी संपात सहभाग नोंदविला. संपातील खालील मागण्यांना प्रशिक्षणार्थींनी एक नोव्हेंबर २००५ नंतर सेवेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक विषय यांची रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत. २० डिसेंबर २०१८ च्या पत्रानुसार एमएससीआयटीची वसुली करण्यात येऊ नये. यावेळी मोहन आव्हाड, श्रावण वाघ, शिवाजी जाधव, राजाराम आव्हाड, सचिन सानप आदींसह शिक्षक सहभागी होते.कांदा लिलाव बंद पाडलेदेवळा : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ तालुक्यातील प्रहार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कांदा उत्पादक संघटना आदी संघटनांनी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कांदा लिलाव आवाराच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन करून दोन तास कांद्याचे लिलाव बंद पाडले.तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना निवेदन दिल्यानंतर दुपारी १२ वाजता कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू झाले. यावेळी बाजार समितीचे संचालक बापू देवरे, सचिव माणिक निकम, कुबेर जाधव, राजेंद्र शिरसाठ, मधुकर पचिपंडे, रविंद्र शेवाळे, प्रवीण पवार, विनोद आहेर जयदीप भदाणे आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सिटू संलग्न देवळा नगरपंचायत कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक संप करीत नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या देत कामबंद आंदोलन करण्यात आले. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सुधाकर आहेर, सुरेश आहेर, दत्तात्रय बच्छाव, वसंत आहेर, गुलाब शिरसाठ, भाऊसाहेब साबळे, सुनील शिलावट, शशिकांत मेतकर, किरण गुजरे, दीपक गोयल, शरद पाटील, चंद्रकांत चंदन, राजेंद्र साळुंके, अर्चना दयेडे, सुशीला घोडेस्वार, संगीता सोनगत, धनुबाई गोयल, हौसाबाई साळुंके, आशा महिरे, ललिता ठाकरे, विमल देवरे, सुरेखा वाघ आदी नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात बंदमुळे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 11:50 PM
जिल्ह्यात विविध संघटनांनी बुधवारी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व नव उदार आर्थिक धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात देवळा तालुक्यातील नगरपंचायत कामगार कर्मचारी संघटना, महसूल विभागाचे कर्मचारी, विविध शेतकरी संघटना आदींनी पाठिंबा देत कामबंद आंदोलन केले.
ठळक मुद्देदेशव्यापी संप : सिन्नरला विडी कामगारांचा मोर्चा; निफाडला विविध संघटनांचे धरणे आंदोलन