पंचवटी:मागील वर्षाप्रमाणेच यंदा पंचवटीत सोनसाखळी, खून, दरोडे, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडल्या असल्या तरी २०१५ मध्ये जबरीने सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे पोलीस दप्तरी असलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. जबरी चोरी पाठोपाठ इतर जबरी चोऱ्यांच्या घटना घडल्या असल्या तरी रात्रीच्या घरफोड्या, खून, दरोडा या घटनांत मात्र घट झालेली आहे. डिसेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग, शासकीय नोकरावर हल्ला, मोटर अपघात, छळवणूक, पळवून नेणे तसेच अपघातांत मृत्यू पावणे अशा जवळपास शेकडो गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ७ खुनाच्या घटना घडल्या होत्या, तर यंदा ५ घटना घडल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखविणे व अन्य कारणांवरून काहीतरी फूस लावून पळवून नेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. याशिवाय मोटारसायकल अपघाताचे प्रमाण गेल्यावर्षीप्रमाणेच आहे. अपघातांत प्राण गमावलेल्यांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाली आहे. विनयभंगाच्या घटना गेल्यावर्षी होत्या तीच आकडेवारी यंदाच्या वर्षी असल्याची नोंद पोलीस ठाण्याच्या दप्तरी करण्यात आलेली आहे. हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्याच्या घटनेतही यंदा वाढ झाली आहे, तर दिवसा घरफोडीच्या प्रमाणात गेल्यावर्षीपेक्षा यंदा वाढ झाल्याचे दिसून येते. मागील वर्षीच्या तुलनेपेक्षा यंदा पंचवटीत केवळ सोनसाखळी चोरीच्या घटनेतच जास्त वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
जबरी चोरीचे गुन्हे, अपघातांत मृत्यू अधिक
By admin | Published: December 30, 2015 10:58 PM