नाशिक : निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वादळवारा व मुसळधार पावसामुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ६५० विजेचे पोल जमीनदोस्त झाले. शहरातील तुटलेल्या विद्युत वाहिन्या व वाकलेले पोल दुरुस्त करण्याचे काम गुरुवारी पहाटे सहा वाजता सुरू करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील २६ विद्युत उपकेंद्राचा पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे.
नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीजच ेपोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर काही भागात सुरक्षेसाठी वीजपुरवठाबंद करावा लागला. तसेच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला होता. याशिवाय वृक्ष, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. यामध्ये जिल्ह्यातील ७५३ वाहिन्यांचा पूरवठा प्रभावित झाला होता. कोरोना विषाणूचे संकट असताना सुरक्षितपणे काळजी घेत चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले.आणि बंद पडलेली बहुतांश विद्युत उपकेंद्र सुरु करीत शहरातील वीज पुरवठा गुरुवारी सहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला. तर जिल्ह्यातील बहुतांश भाग गुरुवारी दुपारपर्यंत पूर्ववत केला. महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर,अधीक्षक अभियंते रमेश सानप आणि प्रविण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, जनमित्र सातत्याने कार्य करीत वीज पुरवठा पूर्ववत केला असुन उर्वरीत सुद्धा सुरू करत आहेत. निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास संबंधित महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.