नाशिकरोड : निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वादळवारा व मुसळधार पावसामुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ६५० विजेचे पोल जमीनदोस्त झाले. शहरातील तुटलेल्या विद्युत वाहिन्या व वाकलेले पोल दुरुस्त करण्याचे काम गुरुवारी पहाटे ६ वाजता सुरू करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील २६ विद्युत उपकेंद्राचा पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त विजेचे पोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता, तर काही भागांत सुरक्षेसाठी वीजपुरवठाबंद करावा लागला. तसेच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला होता. याशिवाय वृक्ष, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. यामध्ये जिल्ह्यातील ७५३ वाहिन्यांचा पुरवठा प्रभावित झाला होता. बंद पडलेली बहुतांश विद्युत उपकेंद्र सुरूकरीत वीजपुरवठा वाजेपासून ९ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला.
वादळामुळे जिल्ह्यात ६५० विजेचे पोल जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 10:11 PM