गतवर्षी सर्वत्र कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शासनाला महसूल जमा करून देणारे देवळा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाजदेखील थंडावले होते. यामुळे शासनाचे नुकसान होत होते. शासनाने मुद्रांक शुल्कात मोठी सवलत दिल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात मुद्रांक व दस्तनोंदणीसाठीही गर्दी वाढून कामकाज पूर्ववत सुरू झाले होते; परंतु आता संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्णय घेतल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सर्व संवर्गातील पाच-सहा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्या द्या; पदोन्नती झाल्याशिवाय नवीन सेवाप्रवेश नियम लावू नयेत, विभागातील रिक्त पदे भरावीत, कोविडने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांच्या विम्यासह अनुकंपा तत्त्वावर भरती करावी, मुंबईतील मुद्रांक जिल्हाधिकारी पद विभागातील पदोन्नतीने भरणे, तुकडेबंदी व रेरांतर्गत झालेल्या कारवाया मागे घ्या, नोंदणी अधिकाऱ्यांवर दाखल होणारे गुन्हे मागे घ्या, विभागीय पदोन्नतीमध्ये संघटनेला प्रतिनिधित्व द्या, विभागीय चौकशीची कारवाई वेळेत करावी, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
फोटो - २२ देवळा