नाशिक : नेटवर्कचा प्रश्न व तांत्रिक दोषामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील आधार केंद्राचे काम दिवसभर सुरू होऊ शकले नाही. सकाळी नऊ वाजेपासून आलेल्या नागरिकांनी अखेर सायंकाळी पाच वाजता निराश होऊन घरचा रस्ता धरल्याने मंगळवारी आधारसाठी नागरिकांची झुंबड उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आधारसाठी नागरिकांची होणारी कुचंबना टाळण्यासाठी शहरात येत्या दोन दिवसांत १४ केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.केंद्र सरकारने सर्वच शासकीय कामकाजासाठी आधार क्रमांक सक्तीचा केला असून, त्यासाठी डिसेंबरअखेरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशा नागरिकांची धावपळ उडाली असून, त्यात ज्यांनी आधारकार्ड काढूनही त्यांचा डाटा करप्ट झाल्याने त्यांना पुन्हा नव्याने आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत आधारकार्ड तयार करून देणाºया खासगी कंपन्यांचे काम बंद करण्यात आले आहे. शासनाने निश्चित केलेले आधार केंद्रे अद्यापही सुरू होऊ शकलेले नाहीत, जे काही बोटावर मोजण्याइतपत केंद्रे सुरू आहेत, तेथे सकाळपासून नागरिकांची झुंबड उडत आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात सोमवारी बिघाड झाला. शनिवारी ज्या व्यक्तींनी नावनोंदणी केली होती, ते सर्व सकाळी ९ वाजेपासून हजर होते तसेच दररोज येणाºया नागरिकांचीही त्यात भर पडली. लवकरच १४ केंद्रेसुरू होणारनाशिक महापालिकेच्या कॉमन सर्व्हीस सेंटरच्या ठिकाणीच १४ आधार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. सोमवारी सदरची केंद्रे सुरू होणे अपेक्षित होते, परंतु केंद्र चालकाने कीट नेले नसल्याचे सांगण्यात आले. या केंद्रांमुळे गर्दीचे विभाजन होणार आहे. तसेच नागरिकांची सोय होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणखी पाच केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असून, ३१ केंद्र सुरू करण्यासाठी यूआयडीकडे अनुमती मागण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी दिली. आधारकार्डची सारी प्रक्रिया आॅनलाइन असल्याने सकाळपासून नेटवर्कचा प्रॉब्लेम सुरू झाला, तो कसा बसा दूर करण्यात आल्यावर पुन्हा तांत्रिक दोष निर्माण झाला. दिवसभर खटाटोप करूनही सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत केंद्र सुरू होऊ शकले नाही अखेर केंद्रचालकाने गाशा गुंडाळला व नागरिकही रिकाम्या हाती माघारी फिरले.