नाशिक : लोकसभा निवडणुकीमुळे तीन दिवस देशी-विदेशी मद्यविक्री व बिअरबार बंद राहणार असल्याने शनिवारी दुपारी तळपत्या उन्हात दारू खरेदीसाठी मद्यपींची गर्दी झाल्याने स्टॉक डे ठरल्याचे चित्र दिसत होते.गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे दुपारी साडेअकरा-बारा वाजेपासून सायंकाळी पाच-साडेपाचपर्यंत सर्वत्र शुकशुकाट पसरत आहे. यामुळे बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे एकीकडे अशी परिस्थिती असून दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता कुठलाही गाजावाजा न करता शांततेत झाली. निवडणुकीत यंदा म्हणावा तसा प्रचाराचा धुराळा उडाला नसल्याची कार्यकर्ते व नागरिकांमध्ये चर्चा असल्याने शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून सोमवार पर्यंत देशी-विदेशी मद्य विक्री व बिअर बार बंद राहाणार आहेत. मंगळवारी मद्य विक्री व बिअर बार खुलणार असून पुन्हा बुधवार (१ मे) महाराष्टÑ दिनामुळे ड्राय डे राहाणार आहे. लोकसभा निवडणूक मतदानामुळे शनिवारी सायंकाळपासून सोमवारपर्यंत तीन दिवस ड्राय डे घोषित करण्यात आल्याने आपल्या सोयीसाठी मद्यपींनी काळजी घेतल्याचे चित्र सर्वच दारू विक्रीच्या दुकानात दिसत होते.सर्वत्र उन्हाच्या कडाक्याने सर्वजण हैराण झाले असतांना तीन दिवसांच्या ड्राय डे मुळे शनिवारी दुपारी तळपत्या उन्हात देशी-विदेशी मद्य विक्रीच्या दुकानात दारू खरेदीसाठी गर्दी झाली होती. आगामी तीन दिवसांचा ड्राय डे मद्यपींसाठी शनिवारी ‘स्टॉक डे’ ठरल्याचे चित्र दिसत होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी शनिवारी दुपारी दारू विक्रीची दुकाने, बिअर बार तपासण्यासाठी फेरफटका मारला. मात्र तत्पुर्वीच सर्व दारू विक्रीची दुकाने, बिअर बार बंद झाले होते.लोकसभा निवडणूक मतदानामुळे शनिवारपासून सोमवार व महाराष्टÑ दिनानिमित्त बुधवारी ड्राय डे घोषित करण्यात आला होता. ड्राय डे संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रसिद्ध केलेले पत्र व्हॉटस्अपवरून व्हायरल झाले होते. तसेच ड्राय डे ची सविस्तर माहिती देणाऱ्या पोस्टदेखील मित्रांची काळजी आहे, या शीर्षकाखाली चांगल्याच व्हायरल होत होत्या.
तीन दिवसांच्या ‘ड्राय डे’मुळे शनिवार ठरला ‘स्टॉक डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:32 AM