संदीप झिरवाळ
नाशिक/पंचवटी - टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तसेच ज्या त्या जिल्ह्यात जाण्यासाठी सवलत मिळावी यासाठी शासनाने चारचाकी वाहनांना फास्ट टॅग लावले आहे. फास्ट टॅगमुळे वाहनधारकांचा वेळ व पैसे वाचत असले तरी या फास्ट टॅगमुळे बसचालकासह अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रत्यय पिंपळगाव टोल नाक्यावर आला.
नाशिकला प्रवासी घेऊन येणाऱ्या मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसवर लावलेला फास्ट टॅग सदोष असल्याचे कारण पुढे करून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तब्बल तासभर बस रोखल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी अखेर खासगी वाहनाचा आधार घेत परतीचा प्रवास केला. पिंपळगाव टोल नाक्यावर शनिवारी (दि.२३) मध्य प्रदेश परिवहन विभागाची बस क्रमांक (एम पी १३ आर १७६६) इंदोर राज्यातून प्रवासी घेऊन महाराष्ट्रात निघाली बस नाशिकला येण्यापूर्वी सोनगीर, धुळे, चांदवड येथिल टोल नाक्यावरून पुढे गेली. सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ही बस पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर येताच या बसवर लावलेला फास्ट टॅग सदोष आहे असे कारण पुढे करून टोल कर्मचाऱ्यांनी बस रोखली. त्यावेळी बस चालक वाहकाने बसला फास्ट टॅग लावला असताना इतर टोल नाक्यावर फास्ट टॅग चालला, मग या टोल नाक्यावर फास्ट टॅग सदोष कसा याची विचारणा केल्यावर टोल नाक्यावरचे कर्मचारी व बसचालकात तू तू मैं मैं झाली.
सदर बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी बसलेले होते बस रोखून धरल्याने प्रवासी खाली उतरले मात्र पाऊस सुरू असल्याने आणि प्रवाशांना घरची ओढ लागल्याने काही प्रवाशांनी विनंती देखील केली. सदोष फास्ट टॅग असेल तर पैसे भरून घ्या आणि बस सोडा अशी विनवणीदेखील चालक व वाचकाने केली मात्र तरी देखील बस रोखून धरली त्यावेळी बसवाहक व चालकाने यापूर्वी अनेकदा बस टोल नाक्यावरून गेल्याचे सांगताच त्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी यापूर्वी जर बस गेलेली असेल तर तेव्हापासून दंड वसूल करणार असे सांगितले. त्यानंतर बसमध्ये ताटकळत बसलेल्या प्रवाशांनी अखेर नाईलाजास्तव बसमधून खाली उतरत नाशिककडे जाणाऱ्या अन्य खाजगी वाहनाने प्रवास करणे पसंत केले. या बसमध्ये लहान मुले, वृद्ध तसेच नोकरदार असल्याने त्यांना टोल नाक्यावरील अरेरावीच्या प्रकारामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.