तुकाराम रोकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, देवगांव (ता. त्र्यंबकेश्वर, जि नाशिक): दिवसागणिक रस्ते विकासाचे जाळे विस्तारत 'समृध्दी'सह विविध महामार्ग प्रगतीपथावर नेणाऱ्या, आधुनिकतेकडे वाटचाल करीत मोनो - मेट्रो, बुलेट ट्रेन चालविणाऱ्या महाराष्ट्रात आजची आदिवासी बांधवांची नदीवरील पुलाअभावी चांगलीच फरफट होत असून मृत्यूनंतरही मृत्यूदेहाची अवहेलना होत आहे.
आजही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाड्या-पाड्यांना पुरेशा सुविधा दिल्या जात नसून स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही वंचित राहावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खडकओहळमधील नागरिकांच्या मृत्यूने नदीपात्र ओलांडताना कसरत करावी लागत असून मृत्यूनंतरही मृत्यूदेहाची हेळसांड होत आहे.
एकीकडे देशातील शहरे प्रचंड प्रमाणात विकास करत असताना खेडी मात्र दुर्लक्षित राहत आहेत. वाडी - पाड्यांवर अद्याप सुविधा न पोहचल्याचे गंभीर वास्तव खडकओहळमध्ये निदर्शनास आले आहे. डिजिटल भारताचे स्वप्न आपण सारेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचे सांगत आहे. परंतु, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यांचा विकास या संकल्पनेत अद्याप आलेला दिसत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना विविध सोयी सुविधा यांची प्रतिक्षाच असून त्यामुळेच केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया डिजिटल इंडिया या योजना त्यांच्यापासून कोसो दूर आहेत. खडकओहळमधील एका ग्रामस्थाचे नुकतेच निधन झाले. त्याच्या अंत्यविधीसाठी नदीपत्राच्या पल्ल्याड स्मशानभूमीत जाण्यासाठी पूलच नसल्याने अन् पावसामुळे पाणीपातळी वाढलेल्या नदीपात्रातून हातांची साखळी करत चार जणांच्या खांद्यावरून अंत्ययात्रा नेताना पंचवीस-तीस नातेवाईकांना मोठे कष्ट सहन करावे लागले.
यावर्षी पावसाचा कहर कमी झाल्याने स्मशानभूमीपर्यंत पोहोचता आले. मात्र, नदीला पूर आल्यास पुलाअभावी मृतदेह अंत्यविधी न करता पूराचे पाणी ओसरण्याची वाट बघावी लागली असती. असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या घटनेचा व्हायरल व्हिडीओ पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख नवनाथ कोठुळे आणि त्यांचे सहकारी आदिवासीदिनाच्या दिवशीच खडकओहळ येथे पोहोचले. त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी गाऱ्हाणी कथन केल्या. मृताच्या नातेवाईकांना हा भयंकर प्रकार कथन करताना अश्रुंचे बांध फुटले. पावसाचा जोर असता, तर दोन दिवस मृतदेह घरातच ठेवावा लागला असता, असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा उपस्थितांच्या अंगावर काटे निर्माण झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी खडकओहळसह परिसरातील पाड्यांना भेट देत येथील समस्या न सुटल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
पूल मंजूर असूनही कामाला दिरंगाई!
खडकओहळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या १२०० च्या आसपास आहे. त्यात खडकओहळ, जांभुळपाडा, विराचा पाडा असे तीन पाडे आहेत. येथील ग्रामस्थांना दुसऱ्या पाड्यावर जाण्यासाठी ओहोळ-नदी ओलांडून जावे लागते. स्मशानभूमी ओलांडताना पूलच नसलेल्या नदीच्या पलीकडे असल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. अंत्यविधीसाठी जाताना, गर्भवतीस दवाखान्यात नेताना, आजारपणात दवाखान्यात जाताना, सर्पदंशासारखी घटना घडल्यावर जिवाशी खेळ होतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना, अंगणवाडीत पोषण आहार पोहोचविताना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते. येथील समस्यांबाबत सरपंच वसंत खुताडे यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले. मात्र, अद्यापही येथील समस्यांकडे यंत्रणांचे लक्ष गेलेले नाही. येथील पुलाचे काम मंजूर आहे. मात्र, पूल झालेलाच नाही. रस्ते व अन्य मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. गैरसोयीने बेजार ग्रामस्थांनी आमच्या ग्रामपंचायतीचा जवळच्याच गुजरात राज्यात समावेश करावा, अशी मागणी केली आहे.
सरकारने स्वातंत्र्य दिनापूर्वी खडकओहळ येथील नदीवरील पुलाचे काम सुरू करून अन्य मूलभूत सुविधा त्वरित पुरवाव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. -नवनाथ कोठुळे, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष, मनसे
ग्रामपंचायतीने येथे रस्ता, पूल या सुविधा करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, आमच्या अर्ज-विनंत्यांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. -वसंत खुताडे, सरपंच, खडकओहळ