धनंजय रिसोडकर, नाशिक : भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणामुळे सर्वच पक्ष पोळून निघाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने जरी १८ जागांवर दावा केला असला किंवा राष्ट्रवादीच्यावतीने काही दावा करण्यात आला असला तरी कुणाच्या किती जागा त्याबाबतचा अंतिम निर्णय समन्वयक समितीच घेणार आहे. अर्थात जागावाटप हा महत्वाचा मुद्दा राहणार असल्याने आघाडीतील घटकपक्षांमध्ये काही प्रमाणात तरी कुरबुरी होणे शक्य असल्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या उपक्रमांचा प्रारंभ नाशिक जिल्ह्यात हंडोरे यांच्या पत्रकारपरिषदेसह पदयात्रा आणि मेनरोडवरील चौकसभेने करण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना हंडोरे यांनी सत्ताधारी पक्ष हा धर्म, जातींमध्ये यादवी माजविण्याचे कृत्य करीत असून ते एकप्रकारे देशच फाेडण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. संपूर्ण देश इंडिया आघाडीला मतदान करेल, असे वाटू लागल्यानेच इंडियाऐवजी भारत करण्याचे प्रयास सत्ताधाऱ्यांचे सुरू आहेत. सरकारे पाडणाऱ्यांना जनता आता वैतागली असून तीच त्यांना धडा शिकवेल. वंचित बहुजन आघाडीकडून अद्याप आघाडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यानंतरच त्याबाबत विचार केला जाईल. मराठा समाजाच्या कोणत्याही आरक्षणाला आमचा आक्षेप नाही. केवळ कुणालाही आरक्षण देताना अन्य कुणावर अन्याय होता कामा नये, ही काळजी सरकारने घ्यावी, असेही हंडोरे यांनी नमूद केले.