कळवण (मनोज देवरे) : कांदा निर्यातबंदी आणि केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी कळवण पोलिसांनी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौदळ, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे आदी शेतकरी नेत्यांना नोटिसा बजावून त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले आहे.
नवीबेज येथून शेकडो कांदा उत्पादक शेतकरी नाशिक येथे रवाना होणार असल्याचे पोलिसांना समजताच शेतकरी नेते देविदास पवार यांच्या निवासस्थानी पोलिसांनी धाव घेत जमलेल्या शेतकरी नेते व शेतकरी बांधवाना नोटीसा बजावत नजरकैदेत ठेवले. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांकडून कोणतेही आंदोलन होऊ नये, यासाठी कळवण पोलीस प्रशासनाने शेतकरी नेत्यांना नोटिसा बजावून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे.