नाशिक : फेब्रुवारी महिना सुरू झाला की तरुणाईला ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध लागतात; मात्र या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यापूर्वी आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. सोमवारी (दि. ७) रोझ डे ने या सप्ताहाची सुरुवात होणार आहे. प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुलाबाच्या फुलाला या दिवशी महत्त्व असते. प्रेमाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून सेलिब्रेशनची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लग्नसराई आणि व्हॅलेंटाइन वीकमुळे प्रेमाचे प्रतीक असलेला गुलाब प्रतिडझन १० ते १५ रुपयांनी महागला आहे.
असा आहे व्हॅलेंटाइन वीक
७ फेब्रुवारी : रोझ डे
८ फेब्रुवारी : प्रपोज डे
९ फेब्रुवारी : चॉकलेट डे
१० फेब्रुवारी : टेडी डे
११ फेब्रुवारी : प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी : हग डे
१३ फेब्रुवारी : किस डे
१४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डे
रोझ डेने सुरुवात
सोमवारी रोझ डेने व्हॅलेंटाइन वीकचा शुभारंभ होणार आहे. यासाठी फूलबाजार गुलाब पुप्पांनी सजला आहे. त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे साजरा होणार आहे.
फूल बाजारात बहर
लग्नसराईमुळे सध्या गुलाबासह सर्वच फुलांना चांगले दर मिळत आहेत. शनिवारी ५० ते १०० रुपये डझनप्रमाणे गुलाब फुलांची विक्री झाली. रविवार आणि सोमवारी दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. नाशिकच्या बाजारपेठेत दिंडोरी, नाशिक तालुका, निफाड, चांदवडमधून गुलाबाची आवक होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या लग्नसराई सुरू असल्याने फूलबाजारात तेजीचे वातावरण आहे. त्यातच व्हॅलेंटाइन वीकमुळे फुलांची मागणी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून देखील गुलाबाची आवक वाढण्यात आली आहे. सध्यस्थितीत फुलाचा आकार आणि रंगानुसार ५० रुपयांपासून गुलाबाची विक्री होत आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष फूल मार्केट असो.