’नाशिक : तब्बल तीन तास उशिराने जिल्हा रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी भेट देत पाहणी केली, परंतु या सर्व प्रकारात रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना वेठीस धरल्याने रुग्णांची मोठी हेळसांड झाली़ यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली़, तर हा नियोजित दौरा नसून अचानक केलेली पाहणी असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा केवीलवाणा प्रयत्न मंत्र्यांनी केला़ गृह व सार्वजनिक आरोग्यमंत्री राम शिंदे हे जिल्ह्यात लग्नसमारंभासाठी आले होते़ यातच त्यांनी कुंभमेळ्याचा आढावा, मध्यवर्ती कारागृहाला भेट व जिल्हा रुग्णालयाला भेट देण्याचे नियोजन केले होते़ मध्यवर्ती कारागृहात सकाळी ११, तर जिल्हा रुग्णालयात ११़३० वाजण्याची वेळ देण्यात आली होती़ यामुळे सकाळी १० वाजल्यापासूनच जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेर काढण्यात आले होते़, तर दोन दोन वेळा स्वच्छता करण्यात येऊन एकदम चकाचक करण्यात आले होते़ रुग्णालय असले तरी अॅम्बुलन्स वगळता इतर वाहनांना मनाई करण्यात आली होती. रुग्ण घेऊन आले असले तरी प्रवेश दिला जात नव्हता.सर्व आरोग्य यंत्रणेसह रुग्ण व नातेवाईकही मंत्री येण्याची व दौरा कधी पार पडून जातो याची आतुरतेने वाट पाहत होते़ परंतु मंत्र्यांनी दिलेली वेळ टळून गेल्यानंतर रुग्णांची व नातेवाइकांची चुळबूळ वाढली़ अखेर तब्बल तीन तास उशिराने लग्नकार्य, कारागृह भेट, जेवण उरकून मंत्रिमहोदयांचे आगमन झाले़ त्यांनी धावता म्हणजे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत दौरा आटोपला आणि प्रस्थानही ठेवले़ यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना तब्बल तीन तास वेठीस धरण्यात आले़ यामुळे संतप्त रुग्णांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)
गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे ‘रूग्णालय बंदी
By admin | Published: January 30, 2015 12:30 AM